महत्वाच्या बातम्या

 भरूचच्या पनौली औद्योगिक क्षेत्रातील संघवी ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये भीषण आग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / भरूच (गुजरात) : गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील जीआयडीसी पनौली औद्योगिक क्षेत्रात शनिवारी दुपारी भीषण आग लागून खळबळ उडाली. संघवी ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कारखान्यात अचानक लागलेल्या आगीचे प्रचंड लोट व काळ्या धुराचे साम्राज्य संपूर्ण परिसरावर पसरले. या घटनेमुळे स्थानिक रहिवासी व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

१५ अग्निशमन गाड्या घटनास्थळी -
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने पनौली औद्योगिक क्षेत्र गाठले. १५ अग्निशमन गाड्या व जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच कारखान्याला व परिसराला झालेल्या नुकसानीचा आकडा देखील अधिकृतरीत्या स्पष्ट झालेला नाही.

परिसरात धुराचे साम्राज्य -
आगीमुळे निर्माण झालेला काळा धूर इतका दाट होता की, आसपासच्या परिसरात श्वास घेणं कठीण झालं. परिस्थिती पाहून कारखान्याजवळील रहिवासी व कामगार मोठ्या संख्येने बाहेर पडले.स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, अचानक एवढी मोठी आग पेटल्याने आम्हाला जीवाची भीती वाटली. परिसर काळ्या धुराने व्यापला होता, त्यामुळे बाहेर पडल्याशिवाय पर्याय नव्हता.

काही महिन्यांपूर्वीच गुजरातमध्ये मोठी दुर्घटना -
गुजरातमध्ये औद्योगिक अपघातांची मालिका सतत सुरू असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. २ एप्रिल रोजी बनासकांठा जिल्ह्यातील डीसा येथे एका बेकायदेशीर फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण राज्य हादरले होते. त्या दुर्घटनेत तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात मध्य प्रदेशातील स्थलांतरित कामगारांचाही समावेश होता.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोट इतका जोरदार होता की जवळच्या घरांच्या भिंती हादरल्या, कारखान्याचे काही भाग कोसळले आणि अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. स्थानिक पोलिस व बचाव पथकांनी वेळीच मदतकार्य सुरू केल्याने आणखी मोठा अनर्थ टळला होता.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह -
भरूचमधील संघवी ऑर्गेनिक्समध्ये लागलेली आग आणि याआधी डीसा येथील स्फोट या दोन्ही घटनांनंतर गुजरातमधील औद्योगिक सुरक्षेची स्थिती आणि संबंधित प्रशासनाचे दक्षतेचे उपाय यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





  Print






News - World




Related Photos