महत्वाच्या बातम्या

 कोस्टल रोडसाठी सावरकर पूल हटवणार : महापालिकेचा निर्णय 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : गोरेगाव येथील वीर सावरकर (एमटीएनएल) उड्डाणपूल, जो महापालिकेने २०१८ मध्ये तब्बल २७ कोटी रुपयांच्या खर्चाने बांधला होता, आता विस्तारित कोस्टल रोड प्रकल्पासाठी अडथळा ठरत असल्याने महापालिकेने तो पाडण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट जोडणारा असून स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांसाठी एक महत्त्वाचा दुवा आहे.

रेडिसन हॉटेलपासून रुस्तमजी ओझोन परिसरापर्यंत असलेला हा पूल गोरेगाव आणि मालाडमधील दळणवळणासाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून, यामुळे प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांवरून १० मिनिटांवर आला आहे. त्यामुळे स्थानिकांनी या पुलाच्या पाडकामाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

दुमजली पुलाचा प्रस्ताव -
पालिकेने सादर केलेल्या नव्या आराखड्यानुसार, या जागी दुमजली उड्डाणपूल उभारण्याची योजना आहे. प्रस्तावित पुलाचा वरचा स्तर मालाडच्या माइंडस्पेसपासून थेट दिंडोशी कोर्टापर्यंत जाणार आहे, तर खालचा भाग सध्याच्या सावरकर उड्डाणपुलाची जागा घेणार आहे. यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांना अधिक चांगली जोडणी मिळणार असून गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरही थेट प्रवेश मिळणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

खर्च व वेळेचा मुद्दा -
या निर्णयावरून वाद निर्माण झाला असून, अनेकांनी महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरिकांचा आक्षेप असतानाही प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विद्यमान पूल तसेच ठेवल्यास कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होईल आणि कामही लांबणीवर पडेल.

त्यामुळे, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणते बदल होतील, दुमजली पुलाचा आराखडा अंतिम रूपात कसा असेल आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन महापालिका काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





  Print






News - World




Related Photos