महत्वाच्या बातम्या

 गोंदिया-बेंगळुरू विमानसेवा १६ सप्टेंबरपासून : दिल्ली सेवेसाठी हिरवा कंदील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : बिरसी येथील विमानतळावरून प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सध्या सुरू असलेल्या गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती विमानसेवेप्रमाणेच १६ सप्टेंबरपासून स्टार एअर कंपनीकडून गोंदिया-इंदूर-बेंगळुरू मार्गावर नवी विमानसेवा सुरू होत आहे. याचबरोबर गोंदिया-दिल्ली थेट विमानसेवा सुरू करण्यासाठीही केंद्र सरकारने अनुकूलता दर्शविली असून, लवकरच या मार्गावरही उड्डाण सुरू होणार आहे.

विमानसेवेचा विस्तार - जिल्हावासीयांसाठी दिलासादायक -
बिरसी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ हे केवळ गोंदिया जिल्हाच नव्हे, तर मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या सीमावर्ती भागांतील नागरिकांसाठीही महत्वाचे केंद्र बनले आहे. २०२२ मध्ये सुरू झालेली गोंदिया-इंदूर सेवा तांत्रिक कारणाने बंद झाली होती. मात्र, त्याच मार्गावर आता पुन्हा सेवा सुरू करत बेंगळुरूपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.

दिल्ली विमानसेवेची शक्यता -
गोंदिया-दिल्ली थेट विमानसेवेसाठी बालाघाटच्या खासदार भारती पारधी यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. या मागणीला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने लवकरच दिल्ली उड्डाणाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

प्रवासासाठी सोयीचे वेळापत्रक -
बेंगळुरू → इंदूर: दुपारी २:३० ला उड्डाण, ४:३० ला पोहोच
इंदूर → गोंदिया: सायं. ५:०० ला उड्डाण, ५:५५ ला पोहोच
गोंदिया → इंदूर: सायं. ६:२५ ला उड्डाण, ७:२० ला पोहोच
इंदूर → बेंगळुरू: सायं. ७:५० ला उड्डाण, रात्री ९:४५ ला पोहोच

जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल -
या नव्या विमानसेवेमुळे गोंदियातून थेट दक्षिण भारताशी तसेच भविष्यात उत्तर भारताशी हवाई संपर्क सुलभ होणार आहे. यामुळे व्यवसाय, उद्योग, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास अधिक सुलभ होईल, तसेच जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.





  Print






News - Gondia




Related Photos