अफगाणिस्तानात भीषण भूकंप : ८०० जणांचा मृत्यू, २ हजार ५०० जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / काबूल : अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात रविवारी मध्यरात्री झालेल्या प्रचंड भूकंपाने भीषण हानी केली. रिश्टर स्केलवर ६.० तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला असून, शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. या दुर्घटनेत तब्बल ८०० जणांचा मृत्यू झाला तर २५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र जलालाबादच्या ईशान्येस २७ किलोमीटर अंतरावर, जमिनीखाली ८ किलोमीटर खोलीवर नोंदवले गेले. हा भूकंप रविवार-सोमवार मध्यरात्री १२.४७ वाजता झाला. त्याचे धक्के अफगाणिस्तानाबरोबर पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात आणि भारतातील दिल्ली - एनसीआरमध्येही जाणवले.
नांगरहार सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रवक्ते नकीबुल्लाह रहीमी यांनी सांगितले की, भूकंपामुळे अनेक घरे कोसळली. सुरुवातीला काही मृत्यूंची माहिती मिळाली होती, मात्र आता मृतांची संख्या ८०० वर पोहोचली आहे. सुमारे १ हजार ५०० जखमींवर उपचार सुरू असून अंतिम आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आपत्तीग्रस्त भागात पोहोचणे अत्यंत कठीण असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये मात्र भूकंपाचे धक्के सौम्य होते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
News - World




Petrol Price




