महत्वाच्या बातम्या

 धौलीगंगा वीज प्रकल्पात भूस्खलन : १९ कर्मचारी बोगद्यात अडकले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / उत्तराखंड : पिथोरागड जिल्ह्यातील धारचुला जवळील इलागड परिसरात धौलीगंगा वीज प्रकल्पात शनिवारी मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे प्रकल्पाच्या सामान्य व आपत्कालीन बोगद्यांमध्ये भूस्खलन झाल्याने राष्ट्रीय जलविद्युत महामंडळाचे तब्बल १९ कर्मचारी पॉवर हाऊसमध्ये अडकले आहेत.

भूस्खलनामुळे पॉवर हाऊसकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला असून मोठ्या प्रमाणात चिखल व दगड साचले आहेत. हा अडथळा दूर करण्यासाठी सीमा रस्ते संघटनेच्या जेसीबी यंत्रणांना तातडीने पाचारण करण्यात आले आहे. काही तासांत रस्ता मोकळा होण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अडकलेले सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. त्यांच्याकडे पुरेसे अन्न व पिण्याचे पाणी उपलब्ध असून कंपनी व स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क ठेवला जात आहे. पॉवर प्रकल्पातून वीज निर्मितीचे काम सुरळीत सुरू असून घाबरण्याचे काही कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी जेसीबीच्या मदतीने चिखल व दगड हटवण्याचे काम सुरू असून लवकरच अडकलेले सर्व कर्मचारी सुरक्षित बाहेर येतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.





  Print






News - World




Related Photos