राजस्थानात मुसळधार पावसाने हाहाकार : आठ जिल्ह्यांत पूरस्थिती, सैन्य तैनात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / राजस्थान : राजस्थानातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोटा, सवाई माधोपूर, टोंक आणि बुंदी जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणावर मदत व बचावकार्य सुरू आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफसोबतच सैन्यही बचावकार्यासाठी तैनात करण्यात आलं आहे.
सवाई माधोपूर आणि बुंदी जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. सवाई माधोपूरमधील तब्बल ३० हून अधिक गावं पाण्याखाली गेली आहेत. या गावांचा मुख्य शहराशी संपर्क तुटला असून राजस्थान–मध्य प्रदेशला जोडणारा महामार्गही पाण्याखाली गेला आहे. एक लाखाहून अधिक नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एनडीआरएफचे जवान सतत पुरग्रस्त भागांत अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे काम करत आहेत. मात्र शनिवारी बचावकार्यात गुंतलेली एनडीआरएफ टीमच अपघातग्रस्त ठरली.ट्रॅक्टर-ट्रॉलीने पूरग्रस्त भागात जाताना वाहनाचा तोल जाऊन ट्रॉली खड्ड्यात पडली. जवानांनी धाडसाने कार्य करत एक सहकाऱ्याला सुरक्षित वाचवले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही; काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान, सवाई माधोपूरच्या जिल्हा मुख्यालयाजवळील लाटिया नाला ओसंडून वाहत आहे. या प्रवाहात एक कार अडकली होती. कारमध्ये चालकासह दोन महिला अडकल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून तिघांनाही सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर ट्रॅक्टरच्या मदतीने गाडीही बाहेर काढण्यात आली.
पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बचावकार्यात गती आणण्यात येत आहे.
News - World




Petrol Price




