महत्वाच्या बातम्या

 चिमूर-आष्टी ऑगस्ट क्रांतीतील क्रांतिवीरांना ऊर्जानगरात अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात चिमूर-आष्टी ऑगस्ट क्रांतीने निर्माण केलेल्या इतिहासाचे स्मरण करीत ऊर्जानगर येथे क्रांतिवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुदेव सेवा मंडळ, ऊर्जानगरच्या वतीने राष्ट्रसंत ऑगस्ट क्रांतीपर्व स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून चिमूरच्या भूमीत १९४२ मध्ये स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. झाड झडले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, नाव लगेगी किनारे या त्यांच्या प्रेरणादायी भजनातून चिमूरकरांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत झाली. १६ ऑगस्ट १९४२ रोजी चिमूरवासीयांनी इंग्रजांच्या सत्तेविरोधात पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ब्रिटिशांच्या बंदुका व संगिनींची पर्वा न करता नागरिकांनी स्वातंत्र्याची लढाई तीव्र केली. १६ ते १८ ऑगस्टदरम्यान चिमूरने ब्रिटिश सत्तेला झुगारून दिल्याने या क्रांतीला स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात विशेष स्थान प्राप्त झाले.

क्रांतिवीरांच्या त्याग, बलिदान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण नव्या पिढीला करून देणे, तसेच त्यांच्या विचारांचे पुनःबीजारोपण करणे, हा कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळ, ऊर्जानगरचे अध्यक्ष शंकर दरेकर होते. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) नंदकिशोर चन्ने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ग्रामगीताचार्य तथा सेवानिवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी दयाराम ननावरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी चंद्रपूर वीज केंद्र कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बोबडे आणि गुरुदेव सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली डुडुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंदकिशोर चन्ने यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. दयाराम नन्नावरे यांनी चिमूर-आष्टी ऑगस्ट क्रांतीच्या विविध घटनांना उजाळा देत स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिवीरांच्या योगदानाची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात शंकर दरेकर यांनी चिमूर-आष्टी ऑगस्ट क्रांतीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही उपाधी मिळाल्याच्या १९ फेब्रुवारी या दिवसाचेही पुढील काळात स्मरण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ग्रामगीताचार्य पदवी प्राप्त दयाराम ननावरे आणि नंदकिशोर चन्ने यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानाजी बावणे यांनी केले, तर हरीचंद्र देवतळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुरुदेवप्रेमींचे सहकार्य लाभले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.





  Print






Related Photos