महत्वाच्या बातम्या

 धान बोनस वितरणात विलंब : ८ हजार ४६० शेतकऱ्यांचा २० कोटींहून अधिक निधी थकीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये, जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत बोनस देण्याची घोषणा केली होती. या योजनेत जिल्ह्यातील एकूण १ लाक ३५ हजार ०१३ शेतकरी पात्र ठरले. सुरुवातीला शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या निधीतून ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा करण्यात आला. मात्र उर्वरित ४५ हजार शेतकरी दीड महिन्यापासून निधीअभावी प्रतीक्षेत होते.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला बोनस वितरणासाठी एकूण २५८ कोटी ७० लाख रुपये आवश्यक होते. मात्र सुरुवातीला केवळ १८३ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांना रक्कम दिली गेली. उर्वरितांसाठी लागणारा ७० कोटी रुपयांचा निधी आठ दिवसांपूर्वी शासनाकडून मंजूर झाला. त्यातून ३६ हजार ५४० शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला, पण आठही तालुक्यांतील अजूनही ८ हजार ४६० शेतकऱ्यांचा २० कोटी ४७ लाख १४ हजार रुपयांचा बोनस अडकलाच आहे.

या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले की, काही धान खरेदी संस्थांनी विक्रीच्या हुंड्या वेळेत जमा केल्या नाहीत, तर काहींनी उशीरा जमा केल्या. या हुंड्या जमा होताच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम पाठवली जाईल.

थकीत चुकार्‍यांपैकी १३३ कोटींचा निधी उपलब्ध -
दरम्यान, रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे ३७५ कोटी रुपयांचे चुकारे तीन महिन्यांपासून थकीत होते. सोमवारी (११ ऑगस्ट) शासनाने यासाठी १३३ कोटी रुपयांचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे वर्ग केला आहे. या रकमेचा वापर १० जूनपर्यंत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती फेडरेशनने दिली आहे.





  Print






News - Gondia




Related Photos