महत्वाच्या बातम्या

 खरीप हंगामात ई-पिक पाहणीसाठी १५ ऑक्टोंबर अंतीम मुदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : पिक पाहणी अधीक गतीमान व पारदर्शक होण्यासाठी शासनाने ॲपद्वारे ई-पिक पाहणीस प्रारंभ केला आहे. या पाहणीसाठी खरीप हंगामाकरीता 15 ऑक्टोंबर ही अंतीम मुदत असल्याने शेतकऱ्यांनी त्याआधी ई-पिक पाहणी नोंदवावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

सामान्यत: शेतकऱ्यांच्या पिक पेऱ्याची नोंद ही तलाठ्यामार्फत केली जाते. बहुतांशवेळा प्रत्यक्ष गट क्रमांकात न जाता शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिक पेरा नोंदविला जायचा. जमीन महसूल कायद्यान्वये शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पध्दत आहे. दोन तीन गावात एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदविली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप असायचा. मात्र महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध केली आहे. त्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहाय्याने ई-पिक पाहणी ॲप हे स्वतंत्र ॲप्लिकेशन तयार केले आहे. त्यात शेतकरी पिकांची माहिती भरतील आणि तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. ही प्रत्यक्ष माहिती त्याच वेळेत रियल टाइम संकलित होईल.


ॲपचा वापर कसा करावा : गुगल प्ले स्टोअर वरुन ई-पिक पाहणी वर्जन 2 हे ॲप डाऊनलोड करावे, त्यात आपला भ्रमणध्वनी क्रमांक टाकून त्यावर येणारा संकेतांक, पासवर्ड, ओटीपी भरून नोंदणी पूर्ण करावी. परिचय यामध्ये स्वत:चा फोटो अपलोड करून इतर माहिती साठवावी. शेतावर पीक पाहणी करतेवेळी इंटरनेट नसेल तरी अडचण नाही. फक्त आपल्या फोनमधील जीपीएस चालू असावे लागते. पुढे गावामध्ये जिथे इंटरनेट नेटवर्क उपलब्ध असेल तिथून पीक पाहणी ॲपमधील अपलोड पर्याय निवडून माहिती अपलोड करावी.


ई-पिक पाहणी ॲप चे फायदे : या ॲपमध्ये केलेल्या पिक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज मिळविणे शक्य होते. या पिक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे देखील सुलभ होणार आहे. ई-पिक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे पीक विमा आणि पिक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी केलेली पिकांची नोंदणी स्वयंम प्रमाणित मानण्यात येते. तसेच केवळ दहा टक्के तपासणी तलाठ्या मार्फत करण्यात येते.


ई-पिक पाहणीचा उद्देश : हे ॲप शेतकऱ्यांचा पिक डेटा आणि पीक टप्प्याचे स्वत:पिक अहवाल देण्यासाठी मदत करते. शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांची व पिकांची स्थिती तलाठी कार्यालयात ठेवली जाते. जीपीएस प्रणालीचा वापर करून पिकाचे फोटो मोबाईल ॲपवर अपलोड केले जातात. शेतकरी स्वत:ॲप डाऊनलोड करून त्यांच्या पिकांची नोंदणी करू शकतात.


ई-पिक पाहणी ॲपचे वैशिष्टये : ई-पिक मध्ये मिश्र पिकातील घटक पिकांसाठी हंगाम, लागवड दिनांक निवडण्याची सुविधा आहे. शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदविल्यानंतर उठ्ठेचाळीस तासांच्या आत यामध्ये सुधारणाही करता येते. गावामध्ये नोंदविलेली पीके पाहणीची माहिती गावातील सर्वाना पाहण्यासाठी उपलब्ध होते.

जिल्ह्यात 4 ऑक्टोबर पर्यंत एकूण 11 हजार 228 शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केलेली आहे. ई-पिक पाहणी करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर असून त्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीचे काम पूर्ण करून घ्यावे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos