अवघ्या काही क्षणांत होत्याचे नव्हते : ट्रकखाली पानठेला, महिला आणि ग्राहक बचावले!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रक डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या बाजूला पलटी झाला. या भीषण अपघातात कार, दोन स्कूटी आणि पानठेल्याचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, ट्रक पानठेल्यावर पलटी होत असताना तेथे उपस्थित असलेली महिला आणि एक ग्राहक थोडक्यात बचावले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास फुटली दीवार वळणाजवळ घडली.
एमएच ०४ एमआर ५६३२ क्रमांकाचा ट्रक आंध्र प्रदेशातून जम्मू-काश्मीरकडे जात होता. भरधाव वेगात असताना वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाला. या अपघातात एमएच ३४ सीडी ५८०९ क्रमांकाची कार, एमएच ३४ सीव्ही ५३५० क्रमांकाची स्कूटी, पानठेला आणि एका ग्राहकाची स्कूटी ट्रकखाली दबली.
अपघतावेळी पानठेल्यात दीपा अक्षय रामटेके ही महिला उपस्थित होती. तसेच एक ग्राहकही तेथे होता. अचानक ट्रक पानठेल्यावर पलटी झाल्याने दोघेही संकटात सापडले; मात्र सुदैवाने दोघांनीही या अपघातातून थोडक्यात बचाव केला. ट्रकचालक जयसिंह ज्ञानसिंह बघेल (वय ५०), रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश यालाही किरकोळ दुखापत झाली.
भरधाव वेग आणि वळणावर चालकाचे सुटलेले नियंत्रण यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात वाहनांचे आणि पानठेल्याचे मोठे नुकसान झाले. मात्र, पानठेल्यातील महिला आणि ग्राहक सुखरूप बचावल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.




Petrol Price




