व्यवसायवृद्धीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करा : जिल्हाधिकारी वान्मथी सी.


- शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचा राउंड टेबल संवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : बदलत्या व्यावसायिक वातावरणाशी जुळवून घेत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उद्योजकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून व्यवसायाची कार्यक्षमता वाढविण्यासोबतच बाजारपेठेतील पोहोच आणि ग्राहकांशी संवाद अधिक व्यापक करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा आणि भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या इनक्यूबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसोबत राउंड टेबल संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुधाकर झळके, जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुनील हजारे, इनक्यूबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरचे केंद्र समन्वयक रुपेश रामगडे तसेच उद्योजक व स्टार्टअप प्रतिनिधी उपस्थित होते.
शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ घेऊन उद्योग-व्यवसाय उभारणाऱ्या उद्योजकांच्या अनुभवातून इतरांना प्रेरणा मिळण्यासोबतच त्यांच्या व्यवसायवृद्धीतील अडचणी समजून घेणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील उद्योजकता आणि स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी असून, व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले.
या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या १० लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. लाभार्थ्यांनी संबंधित योजनांमधून मिळालेल्या आर्थिक व इतर सहाय्याची माहिती देत, त्याचा व्यवसायाच्या उभारणीसाठी आणि विस्तारासाठी कसा उपयोग झाला, याबाबत अनुभव कथन केले. तसेच व्यवसाय करताना आलेल्या अडचणी, आव्हाने आणि त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबतही त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी उद्योजकांच्या व्यवसायवृद्धीच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. उद्योजकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी उपस्थित लाभार्थी, उद्योजक आणि स्टार्टअप प्रतिनिधींशी संवाद साधला. शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या उद्योजकांचे अनुभव जाणून घेणे, त्यांच्या व्यवसायवृद्धीतील अडचणी समजून घेणे आणि जिल्ह्यातील उद्योजकता व स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम करणे, या उद्देशाने या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी इनक्यूबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रथम पारितोषिक एकांश वैद्य आणि चमू, संदिपानी शाळा, वर्धा यांच्या जागो गॉगल या संकल्पनेस मिळाले. द्वितीय पारितोषिक युवराज कुहीकर आणि चमू, बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वर्धा यांच्या डेक्स्ट्रा या संकल्पनेस, तर तृतीय पारितोषिक सुरभी पटेल, बजाज सायन्स महाविद्यालय, वर्धा यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेस प्रदान करण्यात आले.




Petrol Price




