वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट : शेतात काम करताना शेतकऱ्यावर विज कोसळून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव तालुक्यातील कालीमाती येथे मंगळवारी (२७) सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात काम करीत असलेल्या एका शेतकऱ्यावर अचानक विज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सतिश रामकृष्ण फुंडे (४८) रा. कालीमाती असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या रब्बी हंगामातील धान्य कापणी व खरीप हंगामपूर्व तयारीची कामे शेतशिवारात सुरू आहेत. सतिश फुंडे हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत असताना सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास अचानक आकाशात वादळासह विजा चमकू लागल्या. याच दरम्यान त्यांच्यावर विज कोसळली आणि ते जागीच कोसळले. ही घटना इतकी अचानक होती की आसपास काम करणाऱ्या अन्य शेतकऱ्यांनाही काही कळायच्या आतच मोठा अनर्थ घडला.
घटनेनंतर जवळच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेतली आणि सतिश फुंडे यांना मदतीचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती तत्काळ कुटुंबीयांना देण्यात आली, तसेच तलाठी आणि पोलीस स्टेशनलाही कळविण्यात आले.
सतिश फुंडे यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्रशासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा -
शेतात काम करत असताना विजेचा बळी ठरलेल्या सतिश फुंडे यांच्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गाकडून होत आहे. अशा दुर्घटनांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासनाने अधिक ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
News - Gondia




Petrol Price




