नागपुरात एकांतवासामुळे अन्नपाण्याविना वृद्ध दाम्पत्याचा बळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
एकांतवासामुळे सधन दाम्पत्याचा अन्नपाण्याविना बळी गेल्याने समाजमन सुन्न झाला आहे . वृद्ध महिलेचा मृतदेह तीन दिवसांपासून घरात पडून राहिला तर दुर्गंधी सुटल्यामुळे पोलिसांनी जेव्हा दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा वृद्ध व्यक्ती शेवटच्या घटका मोजत होता. त्यालाही रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. 
डॉ. स्टेला फ्रँकलिन डेनियल (वय ६५) आणि फ्रँकलिन डेनियल (वय ७०) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. उच्चशिक्षित असलेले डेनियल दाम्पत्य नंदनवनमधील व्यंकटेशनगर एच बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर २१४ क्रमांकाच्या सदनिकेत राहत होते. त्यांना दोन मुली आहेत. त्यातील एक मुलगी लंडनमध्ये तर दुसरी नागपुरात नंदनवनमध्येच राहते.  शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, डॅनियल दाम्पत्य तुसड्या स्वभावाचे होते. शेजारी, नातेवाईकच नव्हे तर मुलींना घरी येण्यासाठीही ते मनाई करायचे. एवढी चांगली आर्थिक स्थिती असूनही त्यांनी देखभालीसाठी कुणी ठेवले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी जात-येत नव्हते. तीन दिवसांपासून त्यांच्या घरात शेजाऱ्यांना हालचाल जाणवली नाही. शनिवारी त्यांच्या घरातून तीव्र दुर्गंधी येत होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी नंदनवन पोलिसांना फोन करून माहिती दिली. ठाणेदार विनायक चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घराचे दार तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी डॉ. स्टेला यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. फ्रँंकलिनसुद्धा अर्धमेल्यावस्थेत शेवटच्या घटका मोजत होते. पोलिसांनी लगेच त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, तेथे त्यांचाही मृत्यू झाला. एकांतवासामुळे सधन दाम्पत्याचा अन्नपाण्याविना मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तविल्याचे समजते.  
   Print


News - Nagpur | Posted : 2018-10-09


Related Photos