गडचिरोलीतील मुलींना वैमानिक होण्याची संधी : १०० टक्के मोफत निवासी प्रशिक्षण


- जिल्हा परिषदेचा पुढाकार; १ डिसेंबरला मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील गुणवंत मुलींनाही विमान वाहतूक क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्हा परिषद, गडचिरोलीने पुढाकार घेतला आहे. इंडिगो (IndiGo) आणि इंडिगोरीच (IndiGoReach) यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत मुलींसाठी १०० टक्के मोफत निवासी वैमानिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी मंगळवार, १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता समाज कल्याण भवन, गडचिरोली येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गुणवंत मुलींना वैमानिक होण्याचे स्वप्न साकार करता यावे आणि त्यांना विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. आर्थिक परिस्थिती किंवा दुर्गम भागातील वास्तव्यामुळे उच्च दर्जाच्या व्यावसायिक प्रशिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींसाठी ही संधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
बारावी विज्ञान शाखेतील मुलींना प्राधान्याची संधी -
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या विषयांसह किमान ५१ टक्के गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. निवड झालेल्या उमेदवारांना पूर्णतः मोफत आणि निवासी स्वरूपात वैमानिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरची मिळणार माहिती -
१ डिसेंबर रोजी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात वैमानिक प्रशिक्षणाची प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक पात्रता तसेच विमान वाहतूक क्षेत्रातील विविध करिअर संधींबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. इच्छुक मुलींना या क्षेत्रातील संधी समजून घेण्यास आणि भविष्यातील करिअरविषयक निर्णय घेण्यास या कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व इच्छुक मुलींनी या मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित राहून मोफत वैमानिक प्रशिक्षणाच्या संधीची माहिती घ्यावी आणि आपल्या स्वप्नांना नवी दिशा द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.




Petrol Price




