जुन्या वादातून भरदिवसा तलवारीने खून : चार तरुणांनी सिनेस्टाईल पाठलाग करत केली हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी चार तरुणांनी भरदिवसा एक प्रौढाचा पाठलाग करून त्याचा थरारक खून केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील कारंजा येथील संस्कार चौकात घडली. मृतक महेंद्र उर्फ मिलींद्र मदारकर (४९) रा. कारंजा यांचा सोमवारी सकाळी ९:३० ते १० वाजताच्या सुमारास धारदार तलवारीने अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला.
सकाळी महेंद्र मदारकर हे विशाल उईके यांच्या घरी जात असताना आरोपींनी त्याला पाहून तलवारीसह पाठलाग सुरू केला. जीव वाचवण्यासाठी मदारकर सैरावैरा पळू लागले. मात्र विशाल उईके यांच्या घरामागे असलेल्या तिलक बावनथडे यांच्या बांधकामाधीन घराच्या खड्यात ते पडले. त्याचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्यावर डोक्यावर, गळ्यावर, हनुवटीवर, गालावर, हातावर व पायावर एकामागून एक तलवारीचे वार करत त्यांना जागीच ठार केले.
या खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खुनात सहभागी आरोपींची नावे अशी, राजगब्बर इंदल रंगारी (३५) रा. भद्रुटोला, गुलशन प्रकाश उके (३०), अजय लच्छुराम कल्लो (३३) रा. हिमगिरी कॉलनी, कारंजा, कृष्णा उर्फ आलू सत्यभान मेश्राम (२२) रा. कारंजा
सर्व आरोपींना गोंदिया ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, काही दिवसांपूर्वी मृतक मदारकर यांनी आरोपी गुलशन उके याला मारहाण केली होती. त्याच वादातून या हल्ल्याचे कारण असल्याची माहिती समोर येत आहे.
गुन्हा दाखल व तपास प्रगती -
या प्रकरणी रामप्रसाद लालचंद मदारकर (३१) यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०२ (खून), ३४ (सामूहिक उद्देश) तसेच शस्त्र कायद्यान्वये कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रितमकुमार येरमे करत आहेत.
मृतकावरही पूर्वी खुनाचा गुन्हा -
मृतक महेंद्र मदारकर यांच्यावर १९९९ साली गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद होता. मात्र सद्य घटना त्या गुन्ह्याशी संबंधित नसल्याचे स्पष्टीकरण पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी दिले आहे.
संपूर्ण शहर हादरले, कायदा - सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह -
भरदिवसा, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे खुलेआम हत्याकांड घडल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई करून आरोपींना अटक केली असली, तरी अशा घटनांवर कडक उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
News - Gondia




Petrol Price




