महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता : अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याचा आईचा आरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका  प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातून एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करीत तिच्या आईने बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांकडून मुलीचा शोध घेतला जात आहे.

तक्रारीनुसार, मुलगी आपल्या आई-वडील आणि दोन बहिणींसह सरदार पटेल वार्डात राहते. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ती आई आणि बहिणींसोबत घरीच होती. त्यानंतर ती आईचा मोबाईल फोन घेऊन घराबाहेर पडली. काही वेळाने आईने घराबाहेर जाऊन पाहिले असता मुलगी दिसून आली नाही. त्यामुळे तिने नातेवाइकांच्या मोबाईलवरून मुलीच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र मोबाईल बंद असल्याचे आढळले.

यानंतर आईने पतीला फोन करून मुलगी मोबाईल घेऊन बाहेर गेल्याची माहिती दिली. त्यानंतर आई-वडील आणि काकांनी मिळून परिसरातील मुलीच्या मैत्रिणी, नातेवाईक तसेच बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही मुलीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करीत आईने बल्लारपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.





  Print






Related Photos