गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांनी दाखविली माणूसकी


- दोन वर्षीय बालक दगावल्यानंतर प्रेत घरी पोहचविण्यासाठी केली आर्थिक मदत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : रूग्णालय, पोलिस कचेरी आणि कोर्टाची पायरी कधीच चढू नये असे म्हटले जाते. या तिन्ही ठिकाणी ज्याला जावे लागते त्यालाच परिस्थितीची जाण होते. अशाच एका प्रसंगात आज गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात उपस्थित रूग्णांच्या नातेवाईकांनी माणूसकीचा परिचय दिला आहे. परिस्थितीची जाण ओळखून उपस्थितांनी पै - पै गोळा केल्याने एका परिवारास आपल्या लाडक्या पुत्राला गमावल्यानंतर घरी जाण्याची व्यवस्था झाली. विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनाला ही बाब माहित झाल्यानंतर त्यांना घरी जाण्यासाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

अहेरी तालुक्यातील एका दुर्गम गावातील शंकर तोरेम यांचा दोन वर्षीय मुलगा अंजना याला काल १ आॅक्टोबर रोजी येथील महिला व बाल रूग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच अंजनाचा आज २ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. मुलगा दगावल्याचे दुःख उराशी बाळगून घरी मृतदेह घेवून जाण्याची खटपट शंकर तोरेम करीत होता. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याच्याकडे मृतदेह घेवून जाण्यासाठी पैसे नसल्याची बाब इतर रूग्णांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली. यावेळी उपस्थितांनी १० - २० रूपयांची जमेल तेवढी मदत गोळा करण्याचे ठरविले. यातूनच एकूण १ हजार ४९० रूपये गोळा झाले. ही रक्कम तोरेम कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आली. तोरेम कुटुंबीयांच्या मदतीला ऐनवेळी काटलीच्या सरपंचा पार्वता खेडेकर, अंतरगाव येथील शोभा हुलके, चांदाळा येथील मधुकर दर्रो, दोटकुलीचे सरपंच अशोक सातपुते, गडचिरोली येथील अनिल मुन, विशाल दुधबावरे, सामदा येथील संदिप सोमनकर, पालेबारसा येथील लोमेश कावळे, सोनापूर येथील राकेश बोलीवार, गडचिरोली येथील सोनु राणे, दीपक बोलीवार, कुंदन घोगरे, दीपक बांबोळे, कान्होली येथील सुनिल बावणे, नेपाल खेडेकर, रूग्णालयातील वाॅर्ड बाय रमेश मारभते तसेच वार्ड क्रमांक ९ मध्ये भरती असलेल्या रूग्णांचे नातेवाईक धावून आले. त्यांनी आर्थिक मदत करून वाहनाची व्यवस्था केली. तोरेम कुटुुंबीयांना दुःखामध्येसुध्दा थोडाफार आधार मिळाला. मदतीसाठी धावून आलेल्या या दात्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-02


Related Photos