महत्वाच्या बातम्या

 भरधाव ऑटोच्या धडकेत लाँड्री व्यावसायिकाचा मृत्यू : ब्रह्मपुरीत हळहळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविलेल्या तीनचाकी ऑटोने रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय लाँड्री व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नरेंद्र रावजी बारसागडे ३६ वर्ष , रा. हत्तीगोटा चौक, ब्रह्मपुरी असे मृताचे नाव आहे. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी येथील झाशी राणी चौकातील देशी दारूभट्टीसमोरील रस्त्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र बारसागडे हे ब्रह्मपुरी येथील हत्तीगोटा चौकात लाँड्रीचे दुकान चालवित होते. घटनेच्या दिवशी ते झाशी राणी चौकातील देशी दारूभट्टीसमोरील रस्त्यावर उभे असताना स्वप्नील देवीदास रामटेके ३७ वर्ष , रा. बोंडेगाव वार्ड, ब्रह्मपुरी याने आपल्या ताब्यातील ऑटो क्रमांक एमएच ३४ डी ४५४२ भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात नरेंद्र यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर ऑटोचालकानेच जखमी नरेंद्र यांना ख्रिस्तानंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, रात्री ९.३० वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भावाच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी मृताचा मोठा भाऊ योगराज बारसागडे यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी तक्रारीवरून ऑटोचालक स्वप्नील रामटेके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.





  Print






Related Photos