चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या : अंभोरा गावात खळबळजनक घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया तालुक्यातील अंभोरा या गावात गुरुवारी (८ मे) रात्री एक धक्कादायक घटना घडली. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव आरती सुनील पटले (३०) असून, आरोपी पतीचे नाव सुनील मदन पटले (३५) आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील आणि आरती यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या संसारात सुरुवातीच्या काही वर्षांत सौहार्द होते. दाम्पत्याला दीड वर्षांचा एक मुलगाही आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. या वादांचे कारण म्हणजे सुनीलचा आरतीच्या चारित्र्यावर होणारा संशय.
गुरुवारी रात्री उशिरा, सुनील आणि आरती यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात सुनीलने घरात असलेल्या कुऱ्हाडीने आरतीवर सपासप वार केले. या भयानक हल्ल्यात आरतीचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर सुनील घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र काही वेळातच त्याने रावणवाडी पोलिस ठाण्यात हजर होऊन आत्मसर्पण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर हत्या आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नवकार करीत आहेत. आरतीच्या मृत्यूने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे.
News - Gondia




Petrol Price




