दिव्यांग बांधवांची सेवा हाच स्व. प्रभाता विचारांचा वारसा - आ. किशोर जोरगेवार


- मातोश्रींच्या पुण्यतिथीनिमित्त दिव्यांगांना साहित्याचे वाटप; प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टचा सामाजिक उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आई ही केवळ कुटुंबाचा आधार नसते, तर ती माणुसकी, संवेदनशीलता आणि सेवाभावाचे संस्कार देणारी प्रेरणाही असते. स्व. प्रभाताई जोरगेवार यांनी दिलेले संस्कार आणि समाजाप्रती असलेली संवेदनशीलतेची शिकवण आजही आपल्या कार्याला दिशा देत आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि त्यांच्या आयुष्यात आधार निर्माण करणे होय. दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे वाटप करून त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्याचा हा प्रयत्न म्हणजे मातोश्रींच्या स्मृतींना वाहिलेली खरी आदरांजली आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री स्व. प्रभा जोरगेवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांशी संवाद साधून त्यांच्या गरजा, अडचणी आणि दैनंदिन जीवनातील समस्यांची माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमाला भाजपचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री सविता दंढारे, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, दिनकर सोमलकर, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, अनुसूचित जाती अध्यक्ष विमल कातकर, कल्पना शिंदे, दुर्गा वैरागडे, प्रलय मशाखेत्री, श्याम धोपटे, नगरसेविका आशा देशमुख, नगरसेवक जितेश कुळमेथे, नितेश गवळी आदींची उपस्थिती होती.
दिव्यांगांना स्वावलंबी बनविणे ही समाजाची जबाबदारी -
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि स्वावलंबीपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. मात्र, दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि जीवनाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी मदतीचा हात देणे ही समाजाची जबाबदारी आहे. मदत ही केवळ वस्तूंच्या वाटपापुरती मर्यादित नसावी, तर त्यातून संबंधित व्यक्तीच्या आयुष्यात आत्मविश्वास आणि स्वावलंबन निर्माण झाले पाहिजे.
आईचे संस्कार हीच आयुष्यभराची शिदोरी -
स्व. प्रभाताई यांच्या आठवणींना उजाळा देताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आईकडून मिळालेले संस्कार माणसाच्या आयुष्यभर सोबत असतात. दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि समाजातील वंचित घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हीच खरी माणुसकी आहे. मातोश्रींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित हा उपक्रम केवळ स्मृतिदिनापुरता मर्यादित नसून त्यांच्या सेवाभावी विचारांची परंपरा पुढे नेण्याचा एक प्रयत्न आहे. दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात निर्माण होणारी सुलभता हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाची वाटचाल झाली पाहिजे. विशेषतः दिव्यांग बांधवांना शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी समाजाने संवेदनशीलतेने पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रभा जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्व. प्रभा स्मृतींना अभिवादन करताना विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गरजूंच्या मदतीसाठी आणि वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी असे सेवाभावी उपक्रम यापुढेही सुरू राहतील, अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे वाटप करून त्यांच्या जीवनात आधार, आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करण्याचा हा उपक्रम स्व. प्रभाताई जोरगेवार यांच्या स्मृतींना सेवेतून वाहिलेली भावपूर्ण आदरांजली ठरला.




Petrol Price




