मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगाणा राज्याचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर


- मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान 
- छत्तीसगढमध्ये दोन टप्प्यात निवडणूक
वृत्तसंस्था / नवीदिल्ली :
  देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगाणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  , मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तसेच छत्तीसगढमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यात १२ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पाचही राज्यांतील निवडणुकांचा निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तसेच या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापरही केला जाणार आहे. यांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम  या ४ राज्यांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 
दरम्यान, कर्नाटकमधील शिमोगा, बेल्लारी आणि मंड्या या मतदारसंघातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाकडून शनिवारी जाहीर करण्यात आला. या तीनही पोटनिवडणुका ३ नोव्हेंबर रोजी पार पडतील, असे रावत यांनी सांगितले.  मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपाची सत्ता आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तर मागच्या पंधरा वर्षापासून भाजपाचे सरकार आहे. या तिन्ही राज्यात भाजपाला प्रस्थापित सरकार विरोधातील लाटेचा सामना करावा लागणार आहे. २०१३ मध्ये केंद्रातल्या मनमोहन सिंग सरकार विरोधात नाराजी होती. त्यावेळी मोदी लाटेचीही सुरुवात झाली होती. त्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला सत्ता टिकवणे कठिण गेले नाही.  Print


News - World | Posted : 2018-10-06


Related Photos