महत्वाच्या बातम्या

 भरधाव ट्रकची कारला धडक : विद्युत खांब तुटल्याने वीजपुरवठा खंडित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : शहरातील डॉ. सुपारे हॉस्पिटलजवळ सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्यानंतर विद्युत खांबालाही धडक दिली. या अपघातात विद्युत खांब तुटून परिसरातील विद्युत तारा व विद्युत यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गडचिरोलीच्या दिशेने येणारा दालमिया सिमेंटने भरलेला ट्रक (क्रमांक एम. एच. ३४ बी. झेड. ८२७५) आरमोरीतील डॉ. सुपारे हॉस्पिटलजवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी ट्रकने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कार (क्रमांक एम. एच. ३३ व्ही-५०२९) ला जोरदार धडक दिली. त्यानंतर ट्रक थेट विद्युत खांबावर जाऊन आदळला. धडक इतकी जोरदार होती की विद्युत खांब तुटून विद्युत तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सदर कार ही पराग राऊत यांच्या मालकीची असून, त्यांचे वडील, नातू आणि सुनेला उपचारासाठी डॉ. सुपारे यांच्या रुग्णालयात घेऊन आले होते. अपघातानंतर विद्युत खांब तुटल्याने परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णतः खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला असून, विद्युत विभागासमोर दुरुस्तीचे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.





  Print






Related Photos