इंधन दरवाढीचा फटका , आर्थिक भार कमी करण्यासाठी रापम चा भाडेवाढीचा प्रस्ताव


- प्रवाशांना सोसावी लागणार झळ 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई :
  इंधन दरवाढीचा फटका राज्य परिवहन महामंडळाला सुद्धा  बसत आहे.  यामुळे आर्थिक भार कमी करण्यासाठी भाडेवाढीचा प्रस्ताव   एसटीने नुकताच राज्य परिवहन प्राधिकरणाकडे सादर केला. तीन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या १८ टक्के भाडेवाढीपेक्षा या वेळी भाडेवाढ कमी असणार आहे. 
एसटी महामंडळाच्या सर्व गाड्या  डिझेलवर धावतात. गेल्या काही महिन्यांपासून डिझेलच्या किमतीतही सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल २०१८ मध्ये सरासरी प्रति लिटर ६३ रुपये ७६ पैसे दराने महामंडळाला डिझेल मिळत होते. आता या महिन्यात सरासरी ७१ रुपये ८७ पैसे प्रति लिटर दराने डिझेल मिळते. याप्रमाणे महामंडळाला दररोज सरासरी १२ लाख १२ हजार ५०० लिटर डिझेल लागते. एसटी महामंडळ हा घाऊक खरेदीदार असल्याने त्याचे दर महिन्याच्या १ व १५ तारखेला बदलतात. वर्षांला सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे डिझेल लागत असून हा खर्च महामंडळाच्या एकूण खर्चाच्या तुलनेत ३७ टक्के एवढा आहे. सध्या वाढणाऱ्या डिझेलच्या किमतीमुळे एसटीला खर्च परवडण्यासारखा नाही.  त्यामुळेच महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय घेतला. 
प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाकडे असतो. त्यानंतरच एसटी महामंडळाकडून लागू केला जातो. भाडेवाढीचा प्रस्ताव नुकताच प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. वाढते इंधन दर, कामगारांची वेतनवाढ यामुळे एसटीवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे सांगत १५ जून २०१८ पासून तिकीट दरांत १८ टक्के वाढ करण्यात आली होती.  आता पुन्हा प्रवाशांना झळ सोसावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-10-04


Related Photos