महत्वाच्या बातम्या

 माजी आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना किमान मासिक मानधन द्या : सौरभ गादासवार यांची पालकमंत्र्यांकडे मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यातील माजी आमदारांसोबत कार्यकाळात निष्ठेने काम करणाऱ्या स्वीय सहाय्यकांना शासनामार्फत किमान आधारभूत मासिक मानधन लागू करून आर्थिक सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी सौरभ गादासवार यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

माजी आमदारांच्या कार्यकाळात स्वीय सहाय्यकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जनतेच्या विविध समस्या सोडविणे, शासकीय कार्यालयांशी समन्वय साधणे, नागरिकांची कामे मार्गी लावणे तसेच लोकप्रतिनिधींच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात ते मोलाचे योगदान देत असतात. अनेक स्वीय सहाय्यक वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधींसोबत निष्ठेने काम करतात. मात्र, आमदारांचा कार्यकाळ संपल्यानंतर या स्वीय सहाय्यकांसमोर रोजगार आणि आर्थिक स्थैर्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण होतो.

लोकप्रतिनिधींसोबत अनेक वर्षे काम करूनही स्वीय सहाय्यकांना कोणतेही निश्चित आर्थिक संरक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि सेवेचा विचार करून शासनाने त्यांच्याप्रति सहानुभूतीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सर्व माजी आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना किमान आधारभूत मासिक मानधन लागू करावे, यासाठी स्पष्ट शासकीय धोरण निश्चित करावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाच्या निदर्शनास आणून संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंतीही सौरभ गादासवार यांनी पालकमंत्री अशोक उईके यांना केली आहे.





  Print






Related Photos