महत्वाच्या बातम्या

 भररस्त्यात तलवार उगारून दोघांना जीवे मारण्याची धमकी : वाहनचालकाकडून तलवार जप्त 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : रस्त्यावर झालेल्या वादातून दुचाकीवरील दोन तरुणांना तलवार दाखवून धमकावल्याचा प्रकार चंद्रपुरात समोर आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित वाहनचालकाची तपासणी केली असता त्याच्याकडे धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी तलवार जप्त करून संबंधिताविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्रभुलाल दुर्गालाल दरोगा (२३ वर्षे), रा. दातंरा छोटा, जिल्हा भिलवाडा, राजस्थान असे आरोपीचे नाव आहे. तो गुजरात राज्यातील नोंदणी क्रमांकाच्या GJ ०३ BV ९७३० वाहनातून बल्लारपूर कडून चंद्रपूरकडे येत होता. दरम्यान, सैनिकी शाळेसमोरील विरुद्ध दिशेने येणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरील दोन तरुणांसोबत त्याचा वाद झाला. या वादातून त्याने तलवार काढून तरुणांना भीती दाखविल्याचे पोलिसांना सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात आणले. तपासणीदरम्यान त्याच्याकडे पिवळ्या धातूची मूठ आणि लाल रंगाचे म्यान असलेली ८१ सेंटीमीटर लांबीची धारदार लोखंडी तलवार आढळली. पोलिसांनी पंचांसमक्ष तलवार जप्त करून सीलबंद केली. जप्त तलवारीची अंदाजे किंमत एक हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सदर कारवाई चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, पोलीस हवालदार संतोष दंडेवार, पोलीस अंमलदार निलेश ढोक, सुशांत घिवे तसेच वाहतूक विभागाच्या पथकाने केले. चंद्रपूर शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत





  Print






Related Photos