भेंडाळ्यात १ कोटी ४ लाखांच्या स्मार्ट प्रकल्पाचे उद्घाटन


- शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमाल स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंगची सुविधा; शेतकऱ्यांना मिळणार बाजारपेठेशी थेट जोडणीचा लाभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा, तसेच कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, या उद्देशाने चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने उभारण्यात आलेल्या सुमारे १ कोटी ४ लाख रुपये खर्चाच्या स्मार्ट प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना बियाणे व कडधान्यांची स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंगची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे.
मुलचेरा येथील शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीने भेंडाळा येथे हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पांतर्गत यंत्रसामग्रीसाठी स्वतंत्र शेड, बियाणे स्वच्छता व प्रतवारीसाठी आधुनिक यंत्रणा तसेच पॅकेजिंग यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादित शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करून तो अधिक दर्जेदार स्वरूपात बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून देता येणार आहे.
कृषी विभागाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत आत्मा, गडचिरोलीच्या जिल्हा अंमलबजावणी कक्षामार्फत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी नागपूर विभागाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या विभागीय नोडल अधिकारी प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्या प्रमुख तथा आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर आणि जिल्हा नोडल अधिकारी अर्चना कोचरे उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतमालाच्या मूल्यवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. कडधान्यांची स्वच्छता, प्रतवारी आणि योग्य पद्धतीने पॅकेजिंग केल्यास उत्पादनाचा दर्जा सुधारतो. परिणामी, शेतमालाला बाजारपेठेत अधिक चांगला दर मिळण्यास मदत होते. केवळ उत्पादन वाढविण्यावर भर न देता शेतमालाची गुणवत्ता, प्रक्रिया, साठवणूक आणि विक्री व्यवस्थेकडेही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल सामूहिकरीत्या संकलित करणे, त्यावर आवश्यक प्रक्रिया करणे आणि मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी करून बाजारपेठेशी थेट जोडणी निर्माण करणे, यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. अशा प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित होऊन व्यवसायाभिमुख शेतीकडे वाटचाल करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाला विभागीय अंमलबजावणी कक्षाचे वित्तीय प्रवेश सल्लागार सत्यपाल ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र गिरीपुंजे, चामोर्शीचे तालुका कृषी अधिकारी तुमडाम, मुलचेराचे तालुका कृषी अधिकारी पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, भागधारक, सभासद आणि परिसरातील शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुलचेरा येथील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवटे यांनी केले, तर जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे वित्तीय प्रवेश सल्लागार कैलास शहारे यांनी सूत्रसंचालन केले. भेंडाळा येथे सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध झाली असून, उत्पादनाचे मूल्यवर्धन, सामूहिक विक्री आणि बाजारपेठेशी थेट संपर्क प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




Petrol Price




