महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज तालुक्यात सट्टा जुगार अवैध दारू विक्री जोमात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज :
देसाईगंज शहरासह तालुक्यातील अवैध दारूविक्रीवर आळा घालून महिलांना दिलासा द्यावा, अशी ओवाळणी मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी देसाईगंज पोलिसांकडे रक्षाबंधन सणाला मागितली होती. याशिवाय महिलांनी वारंवार निवेदने दिली होती, परंतु शहरातील अवैध दारूविक्री बंद झाली नाही. त्यामुळे आपण मागितलेली ओवाळणी व्यर्थ गेली की काय, अशी भावना महिलांमध्ये आहे. आता गाव संघटनेच्या महिला स्वस्थ बसणार नाहीत तर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, रक्षाबंधन कार्यक्रमात ओवाळणीमध्ये तालुक्यातील सर्व गावे आणि देसाईगंजच्या वॉर्डामधील अवैध व्यवसायांवर आळा बसावा, ही ओवाळणी मागितली होती, परंतु सद्यस्थितीत अवैध व्यवसायांत वाढ झाल्याचे दिसून येते. शहरातील दारूविक्री बंदीसाठी ११ ऑगस्टला पहिले निवेदन देण्यात आले, दुसरे निवेदन १० ऑक्टोबरला देण्यात आले. या कालावधीत पोलीस विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी पुन्हा तिसरे निवेदन सादर करण्यात आले. अवैध व्यवसाय सुरूच असल्याने दारूमुळे अनेक आजार, अपघात वाढले आहेत. युवा पिढी दारूच्या आहारी जात असून, त्याचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता उचित कार्यवाही करून तसे तालुका संघटना अध्यक्षांना लेखी कळवावे, असे महिलांनी निवेदनात म्हटले. निवेदनावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन महिलांना दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos