चॉकलेट, बिस्किटच्या आडून खर्राविक्री कोरची शहरातील प्रकार : लपून छपून खर्र्‍याची होमडिलिव्हरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : 
कोरोंना संसर्गाचा धोका लक्षात घेता खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे पानठेले बंद करण्याचे आदेश आहे. पण चॉकलेट, बिस्किट असे पदार्थ विकण्याची मुभा घेत त्या आडून कोरची शहरात खर्राविक्री होत आहे. मुक्तिपथच्या सहकार्याने नगर पंचायतने अशा काही दुकानांवर दंडात्मक कारवाई देखील केली. पण असे प्रकार सुरूच असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे.

कोरोना संसर्गाने बाधित व्यक्तीच्या थुंकीतून या आजाराचा धोका सर्वाधिक असतो. खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारे सातत्याने थुंकत असतात. त्यामुळे शासनाने खर्रा व तंबाखूविक्री करणार्‍या पानठेलाधारकांना दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले. सोबतच थुंकणार्‍या व्यक्तीवर दंड ठोठावण्याचीही तरतूद केली आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासनानेही हेच आदेश सर्वत्र लागू केले. त्यामुळे कोरची शहरातील पानठेले आतापर्यंत बंद होते. तरीही लपून छापून विक्री सुरू होती. ही बाब मुक्तिपथ तालुका चमूने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत अनेकदा कारवाई केली.

रोजगाराचा प्रश्न उपस्थित करून शहरातील काही पानठेलाधारकांनी खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ न विकता चॉकलेट, बिस्किट व रोजच्या वापरातील वस्तु विकण्याची परवानगी मागितली. नगर पंचायतने सशर्त परवानगीही दिली. पण याचा गैरफायदा घेत शहरातील १०  ते १५  पानठेलाधारकांनी खाद्य पदार्थाच्या विक्रीआडून लपून छापून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सुरू केली. हा प्रकार लक्षात येताच मुक्तिपथ तालुका संघटक नीळा किन्नाके यांनी नगर पंचायत पदाधिकार्‍यांसोबत अशा दुकानांची बुधवारी झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाचे साठे सापडले. हे साठे नष्ट करून विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. खाद्यपदार्थांसोबत तंबाखूजन्य पदार्थ विकणे हा गुन्हा असल्याचेही मुक्तिपथ ने या विक्रेत्यांना संगितले. कोरोना संसर्गाचा धोका असल्याने हा प्रकार बंद करण्याचे आवाहनही केले.

-------------

खर्रा एका खिशातून दुसर्‍या खिशात

काही खर्राविक्रेत्यांनी वेगळी शक्कल लढवली असून तयार खर्रे खिशात ठेवून ज्यांना पाहिजे त्यांना पोहोचविले जातात. तर कधी खाणारे शौकिनही या लोकांपाशी येत खर्रा घेऊन जातात. चार पट किमतीने हे खर्रे विकले जात आहे. एका खिशातून दुसर्‍या खिशात हा खर्रा पोहोचत आहे. पण त्याचबरोबर कोरोना देखील एका खिशातून दुसर्‍या खिशात जाण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-25


Related Photos