भिसीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तिघांना पकडले : १० लाखांचा ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई करत तिघांना पकडले. नवेगाव येथून पुयारदंडकडे विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी मध्यरात्री नाकाबंदीदरम्यान पकडला. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती असा एकूण १० लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बंडी परसराम उघडे (२७), तेजस अरुण कुंचले (२०) आणि करण राजू नागपुरे (२६), तिघेही रा. भिसी, ता. चिमूर यांना पोलिसांनी पकडले आहे.
१३ नोव्हेंबर रोजी रात्री गस्तीवर असताना भिसी पोलिसांना नवेगाव येथून पुयारदंडकडे ट्रॅक्टरद्वारे अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन १४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास पुयारदंड येथील शंकरपूर-भिसी मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी नवेगावकडून येणारा ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती आढळून आली. रेती वाहतुकीचा परवाना मागितला असता चालकाकडे कोणताही वैध परवाना मिळून आला नाही.
पोलिसांनी या कारवाईत महिंद्रा युवो टेक ४७५ डीआय कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर (किंमत ८ लाख ५० हजार रुपये), एन. के. इंडस्ट्रीज कंपनीची लाल रंगाची ट्रॉली (किंमत १ लाख ५० हजार रुपये) आणि एक ब्रास रेती (किंमत ५ हजार रुपये), असा एकूण १० लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास भिसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पोटभरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे




Petrol Price




