फटाक्यांच्या माळेवरून झालेल्या वादात शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : फटाक्यांची माळ मोटारसायकलखाली आल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी येथील फवारा चौकात घडली. या घटनेत शेतकऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या प्रकरणी विवेक दादा राऊत ३७ वर्ष , छोटू दादाजी राऊत ३५ वर्ष, दादाजी राऊत ६०वर्ष आणि त्यांच्या दुकानात काम करणारा जिभकाटे नावाचा कर्मचारी अशा चौघांविरुद्ध ब्रम्हपुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), २९६ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुजरी वॉर्ड, ब्रम्हपुरी येथील विनोद मुर्लीधर पिल्लारे ३९ वर्ष हे ८ नोव्हेंबर रोजी रात्री आपल्या पुतण्यासह मोटारसायकलने शेतावरून घरी परतत होते. फवारा चौकातील दादाजी राऊत यांच्या दुकानासमोर फटाक्यांची माळ लावलेली होती. मात्र, ती माळ दिसून न आल्याने पिल्लारे यांची मोटारसायकल तिच्यावरून गेली. यावरून विवेक राऊत याने त्यांना आवाज देऊन थांबविले. त्यानंतर फटाक्यांच्या माळेवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. यावेळी चौघांनी मिळून पिल्लारे यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत ते खाली पडले असता विवेक राऊत याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी रॉडने वार केला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्राव झाला. तसेच कमरेला व डाव्या हातालाही खरचटले. जखमी अवस्थेत त्यांनी स्वतःचा बचाव करीत घरी धाव घेतली. त्यानंतर पत्नीच्या मदतीने आस्था हॉस्पिटल, ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी दाखल झाले. तब्येत सुधारल्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी विनोद पिल्लारे यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगदीश झाडे करीत आहेत.




Petrol Price




