महत्वाच्या बातम्या

 उमानूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांची ज्ञानाची दिवाळी उत्साहात साजरी


- ३२ गावांतील विद्यार्थ्यांचा सहभाग; स्पर्धा परीक्षा, रेला स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थ्यांसह नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा गौरव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (उमानूर) : अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे, त्यांच्यात स्पर्धात्मक परीक्षांविषयी आवड निर्माण व्हावी आणि शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने उमानूर येथे १४ नोव्हेंबर २०२६ रोजी ज्ञानाची दिवाळी हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक इलाका ग्रामसभेच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात परिसरातील ३२ गावांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले, तर दुपारच्या सत्रात पारंपरिक रेला स्पर्धा घेण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यासाचे नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

स्पर्धा परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा शिल्ड आणि पुस्तके देऊन गौरव करण्यात आला. योग्य मार्गदर्शन, नियमित अभ्यास आणि नियोजनबद्ध तयारीच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात, असा विश्वास या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नवनियुक्त कर्मचारी आणि एमबीबीएस विद्यार्थ्यांचा गौरव -
कार्यक्रमात उमानूर परिसरातील नव्याने शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा तसेच एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शिल्ड आणि पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींनी आपल्या यशाचा प्रवास, शैक्षणिक अनुभव आणि संघर्ष उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मनोगतातून मांडला. त्यांच्या अनुभवांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रेरणा मिळाली.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीनिवास गावडे, रुपेंद्र तलांडी, श्रीनिवास मडावी आणि नारायण गावडे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पोरतेट आणि सत्यनारायण कोडापे यांनी केले.

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जाणीव निर्माण करणे, स्पर्धा परीक्षांविषयी आत्मविश्वास वाढविणे आणि यशस्वी युवकांचे अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, या दृष्टीने ज्ञानाची दिवाळी उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.





  Print






Related Photos