महत्वाच्या बातम्या

 दीक्षाभूमीवरील कार्यक्रमासाठी परवानगीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस                                                                                                                   

प्रतिनिधी / चंद्रपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त १५ व १६ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर रॅली व कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी द्यावी, तसेच दीक्षाभूमी परिसरातील विविध प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी दीक्षाभूमी मुक्ती जनआंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली.

दीक्षाभूमीवर १९९१-९२-९३-९४ या कालावधीत बौद्ध व आंबेडकरी जनतेच्या सहभागातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर दरवर्षी येथे येणाऱ्या बौद्ध व आंबेडकरी अनुयायांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरातील उपलब्ध जागेचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

१५ व १६ ऑक्टोबर रोजी रॅली व कार्यक्रम घेण्यास परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच दीक्षाभूमी परिसरात नवीन बांधकामांना मंजुरी देऊ नये, कारण उपलब्ध जागा बौद्ध अनुयायांसाठी अपुरी पडत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. दीक्षाभूमीवरील बौद्ध विहाराच्या स्तूपाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निवेदनातून उपस्थित करण्यात आला. बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या उपस्थितीत पाच सदस्यीय स्थापत्य अभियंत्यांच्या समितीमार्फत स्तूपाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे आणि त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, १५ व १६ ऑक्टोबरदरम्यान दीक्षाभूमी परिसरात तसेच सुरक्षा भिंतीलगत पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात स्टॉल्स उभारण्यात येतात. या स्टॉल्समुळे अनुयायांसाठी उपलब्ध जागा कमी होऊन गर्दीच्या वेळी मोठी गैरसोय निर्माण होते. त्यामुळे दीक्षाभूमी परिसरात अशा स्टॉल्सना परवानगी देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या रॅली व कार्यक्रमास यावर्षीपासून प्रशासनाने परवानगी द्यावी आणि बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या भावनांचा आदर करीत दीक्षाभूमी परिसरातील प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जनआंदोलनाच्या वतीने करण्यात आली.

निवेदन सादर करतेवेळी ॲड. राजस खोब्रागडे, प्रतीक डोर्लीकर, ॲड. अजय दुर्गे, ॲड. प्रियंका चव्हाण, हर्षवर्धन कोठारकर, प्रणित तोडे, आमिष मेश्राम, हर्षल खोब्रागडे, करण सोमकुवर, सोहन रंगारी, लुंबिनी गणवीर, युगान डवले, प्रशील झाडापे, चैतन्य बजाज, चारिका भगत, अनिल खोब्रागडे, राज बडोले, जयदीप खोब्रागडे, यथार्थ धोटे, सुमित गोडघाटे, कमलाकर खोब्रागडे, अजय चव्हाण, स्वप्ना शंभरकर, अंकुश जीवने, मृणाल कांबळे, गीता रामटेके, निर्मला नगराडे यांच्यासह आंबेडकरी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos