महत्वाच्या बातम्या

 पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून १६ वर्षीय मुलीचा विनयभंग


- ५६ वर्षीय आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास; विशेष पोक्सो न्यायालयाचा निकाल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ५६ वर्षीय आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अशोक सदाशिवराव तळवेकर रा. भगवतीनगर, हुडकेश्वर असे आरोपीचे नाव आहे. सत्र न्यायाधीश एच. ए. अन्सारी यांनी मंगळवारी या प्रकरणात निकाल दिला.

ही घटना २१ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. संबंधित १६ वर्षीय मुलगी त्यावेळी घरात एकटी होती. याचदरम्यान अशोक तळवेकर तिच्या घराजवळ आला. तहान लागल्याचे सांगून त्याने मुलीकडे पाणी मागितले. त्यानंतर बळजबरीने घरात प्रवेश करून तिच्याशी असभ्य वर्तन केले आणि तिचा विनयभंग केला.

घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने ही बाब नातेवाईकांना सांगितली. नातेवाईकांनी तत्काळ हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक  किरण महामुनी यांनी केला. तपासादरम्यान पोलिसांनी आवश्यक पुरावे संकलित केले आणि संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

प्रकरणाची सुनावणी विशेष पोक्सो न्यायालयात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने योगिता राऊत यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी न्यायालयासमोर उपलब्ध ठोस पुरावे सादर करून आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला. सरकारी पक्षाचे पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि प्रकरणातील अन्य बाबींचा विचार केल्यानंतर न्यायालयाने अशोक तळवेकर याला दोषी ठरविले.

त्यानंतर सत्र न्यायाधीश एच. ए. अन्सारी यांनी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अल्पवयीन मुलीविरुद्धच्या गुन्ह्यात आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आल्याने अशा प्रकरणांमध्ये कायद्याच्या माध्यमातून कठोर कारवाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.





  Print






Related Photos