गुन्हे लपवल्याचं प्रकरणी : फडणवीस यांना जामीन मंजूर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नागपूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ३० मार्च रोजी पुढच्या सुनावणीसाठी हजर रहावे लागणार आहे. फडणवीस यांनी सत्र न्यायालयात मुख्य प्रवेशद्वाराऐवजी मागाच्या दरवाजाने प्रवेश केला असे एबीपी माझाच्या प्रतिनिधीने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरुन सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे.
या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याची गरज नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात वकील सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गेल्या ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल केला होता.
दरम्यान कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फडणवीस यांनी फेरविचार याचिका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला.  Print


News - Nagpur | Posted : 2020-02-20


Related Photos