महत्वाच्या बातम्या

 बहुजनांच्या हक्कांसाठी आता संघटित लढा उभारण्याची वेळ : कोजागिरी स्नेहमिलनातून एकजुटीचा संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : संविधानिक अधिकार, आरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी बहुजन समाजाने जात-पात आणि पोटजातींच्या भिंती ओलांडून एकत्र यावे. समाजातील विखुरलेपण दूर करून संघटित शक्ती निर्माण केल्याशिवाय आपल्या हक्कांचे संरक्षण शक्य नाही, असा सूर बहुजन विचार मंचाच्या विशेष कोजागिरी स्नेहमिलन सोहळ्यात उमटला. खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह विविध मान्यवरांनी बहुजन एकजुटीची आवश्यकता अधोरेखित केली.

बहुजन विचार मंचाच्या वतीने आयोजित या स्नेहमिलन सोहळ्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देशातील आणि राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य केले. लोकशाही मूल्ये आणि संविधानिक अधिकारांसमोर आव्हाने निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व अधोरेखित केले. उद्या मत वाचले तरच देश आणि संविधान वाचेल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. आरक्षणाच्या धोरणांमध्ये होत असलेल्या बदलांमुळे बहुजन तरुणांच्या संधींवर परिणाम होत असल्याचा आरोप करत या प्रश्नांवर समाजाने एकजुटीने आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सुधाकर अडबाले यांनी बहुजन समाजातील अंतर्गत विभाजनावर चिंता व्यक्त केली. जाती-पोटजातींमध्ये विभागल्यामुळे समाजाची सामूहिक ताकद कमी झाली आहे. आपल्या अधिकारांवरील आघात रोखण्यासाठी सर्वांनी एकाच विचाराने आणि एकाच व्यासपीठावर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

बहुजन विचार मंचाचे संयोजक सूर्यकांत खनके यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे हा मंचाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. संविधानाने दिलेले अधिकार आणि आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. दिलीप चौधरी यांनी इतिहासातील सामाजिक संघर्षाचा संदर्भ देत शोषणाच्या बदलत्या स्वरूपाबाबत भाष्य केले. संविधानाचे संरक्षण आणि बहुजनांच्या न्याय्य हक्कांसाठी वैचारिक व्यासपीठांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

या सोहळ्याला माजी आमदार देवराव भांडेकर, महाराष्ट्र अनुसूचित जाती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, कुणबी समाजाचे अध्यक्ष मालेकर, डॉ. दिलीप कांबळे, गटनेते सुरेंद्र अडबाले, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुंदा जेणेकर, ओबीसी ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत थेरे, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे, चंद्रपूर काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नरुले, डॉ. संजय घंटे, बालवीर सिंग गुजर, अजगर अली आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांनी केले, तर प्रोफेशनल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा यांनी आभार मानले.





  Print






Related Photos