क्राईम ब्रँच लेडी पीएसआय लक्ष्मीछाया तांबूसकर ठरल्या गुन्हेगारासाठी कर्दनकाळ


- खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढून आरोपींना केले जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
एका इसमाची हत्या करून त्याचा मृतदेह स्थानिक भंडारा मार्गावरील कापसी पुलाजवळ खड्डयात पुरण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा पथकातील पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबूसकर यांनी या प्रकरणाचा छडा शिघ्रगतीने लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्याने आरोपींसाठी त्या कर्दनकाळ ठरल्या आहेत. या प्रकरणातील चार आरोपींना जेरबंद करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पंकज दिलीपराव गिरमकर (३२) रा. बाकरे लेआउट, समतानगर सावंगी मेघे जि. वर्धा असे हत्या करून खड्डयात पुरण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. मृतक पंकज हा हल्दीराम कंपनीत टेक्निशियन म्हणून कार्यरत असून तो एक महिन्यापासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिस ठाणे पारडी (नागपूर शहर) येथील गुन्हे शाखा पथक क्रमांक २ ला मिळाली. यावरून तपासचक्रे फिरविण्यात आली. या प्रकरणाचा मुख्य तपास पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबूस्कर यांच्याकडे सोपविण्यात आला असता त्यांनी पोलिस हवालदाराच्या मदतीने सदर प्रकरणाचा तपास लागलीच सुरू केला. दरम्यान, भंडारा मार्गावरील कापसी पुलावजळील जोगेंद्रसिंग ढाबा येथे अंदाजे एक महिन्यापूर्वी पंकज या युवकाची हत्या करून ढाब्याजवळील एका खड्डयात त्यास पुरण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार तपासचके्र वेगाने फिरवून या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबूसकर यांनी घेतला. तपासादरम्यान जोगेंद्रसिंग ढाब्यावर वेळोवेळी व अहोरात्र लक्ष केंद्रीत करून नमूद ढाब्याचा मालक अमरसिंग व तेथे काम करणारे इसमांच्या हालचालींवर बारकाईने पाळत ठेवून अमरसिंग, ढाब्याचे कूक मुन्ना तिवारी यांच्यावर दाट संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून विश्वासात घेतले व विचारपूस केली असता त्यांच्या इतर दोन मित्रांसह त्याचा खून केल्याची कबुली दिली. त्यावरून ढाबा मालक अमरसिंग उर्फ लल्लू जोगेंद्रसिं ठाकूर (२०) रा. चैतन्य जनरल स्टोर्स, भंडारा रोड कापसी नागपूर, ढाब्याचा कूक मनोज उर्फ मुन्ना रामप्रवेश तिवारी (३७) रा. जिल्हा बक्सर बिहार, (ह. मु. जोगेंद्रसिंग ढाबा उमीया गेटजवळ भंडारा रोड कापसी नागपूर शहर), ढाब्याचा वेटर भाई जान नावाचा इसम रा. बालाघाट व ढाबा मालकाचा मित्र शुभम उर्फ तुषार राकेश डोंगरे (२८) व्यवसाय चारचाकी वाहन चालक, रा. इमामवाडा पोस्ट ऑफिसजवळ न्यु वाल्मीक काॅलनी कापला या चार आरोपींना २ फेब्रुवारी २०२० रोजी अटक करण्यात आली आहे. यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून भाई जान हा इसम फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबूसकर यांनी अवघ्या काही दिवसातच आरोपींना जेरबंद करून त्यांच्या मुसक्या आवळल्याने सदर हत्या प्रकरणातील आरोपींसाठी त्या कर्दनकाळच ठरल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस ठाणे पारडीचे (नागपूर शहर) पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे, सहायक फौजदार संतोष मदनकर, रामनरेश यादव, नाईक पोलिस शिपाई रवी शाहू, सतीश पांडे, पोलिस शिपाई योगेश गुप्ता, शेषराव राऊत, पोलिस हवालदार निनाजी तायडे, अरविंद झिलपे यांनी सहकार्य सहकार्य केले आहे. सदर कारवाई अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे निलेश भरणे, पोलिस उपआयुक्त डिटेक्शन गजानन राजमाने, सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लक्ष्मीछाया तांबूसकर ह्या गडचिरोली येथे कार्यरत असताना सुद्धा त्यांचे कार्य उत्तम होते. त्यामुळे त्यांच्याबाबत गडचिरोलीकरांमध्ये आपुलकी आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2020-02-03


Related Photos