चंद्रपूर पोलीस दलाचा सण-उत्सव आणि निवडणुकीत चोख बंदोबस्त : ६,६३८ समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील सलग सण-उत्सव, भव्य मिरवणुका, महामेळावे आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने २४ तास सजग राहून चोख बंदोबस्त तैनात केला. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या प्रभावी नियोजनामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश आले. या कालावधीत गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान एकूण ६ हजार ६३८ समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या डीजे वाजविणाऱ्यांविरुद्ध १५ गुन्हे दाखल करण्यात आले.
जिल्ह्यात श्रावण मास, नागपंचमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, बैलपोळा-तान्हापोळा, गणेशोत्सव, मसकऱ्या गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ऐतिहासिक दसरा मेळावा, रावण दहन, श्री माता महाकाली महोत्सव तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले होते. पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, विविध शाखांचे पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार आणि गृहरक्षक दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडली.
सण-उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी पोलिसांनी पूर्वतयारीवर विशेष भर दिला. गणेश मंडळांच्या ५०, शांतता समितीच्या ४५, मोहल्ला कमिटीच्या २१, पोलीस मित्रांच्या २४, नागरिक समन्वय समित्यांच्या २६ आणि विविध शासकीय विभागांसोबत ३५ अशा २०० हून अधिक बैठका घेण्यात आल्या. संवेदनशील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम घेण्यात आली, तर १३ पोलीस ठाण्यांतील दंगल नियंत्रण साहित्याची तपासणी करण्यात आली.
यंदाच्या गणेशोत्सवात पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच ‘एक गणेश मंडळ, एक पोलीस अंमलदार’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गणेश मंडळांशी समन्वय राखून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात २ हजार २१३ सार्वजनिक आणि १३ हजार ४८७ खासगी अशा एकूण १५ हजार ७०० गणेशमूर्तींची स्थापना झाली होती. तसेच ८५७ मसकऱ्या गणपतींची स्थापना करण्यात आली होती. या सर्व मूर्तींचे विसर्जन नियोजनबद्ध पद्धतीने शांततेत पार पडले. सुमारे १५ दिवस चाललेल्या विसर्जन मिरवणुकांदरम्यान इरई नदी, दाताळा मार्ग आणि वरोरा येथील मामा तलाव परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान जिल्ह्यात ३ हजार ७५५ हून अधिक दुर्गा व शारदा मूर्तींची स्थापना करण्यात आली, तर ४८ ठिकाणी दांडिया रासचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा, तात्पुरते वॉच टॉवर आणि महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथके तैनात करण्यात आली होती. गस्त वाढवून गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका गणेश मंडळासह चार दुर्गा व शारदा मंडळांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
श्री माता महाकाली महोत्सवादरम्यान पालखी प्रदक्षिणा आणि महाआरतीसाठी सुमारे ३० ते ४० हजार भाविक उपस्थित होते. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी बॅरिकेडिंग, प्रवेश-निर्गमन मार्ग आणि गर्दी नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे आयोजित पवित्र अस्थिकलश रॅलीत ८ ते १० हजार नागरिक सहभागी झाले, तर मुख्य सोहळ्यासाठी सुमारे अडीच ते तीन लाख अनुयायी उपस्थित होते. या सोहळ्याच्या सुरक्षेसाठी दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, १५ पोलीस निरीक्षक, ६६ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ७६७ पोलीस अंमलदार आणि १०४ वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ड्रोनद्वारे देखरेख, अखंडित व्हिडिओग्राफी आणि दंगल नियंत्रण पथकांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात आले.
पारंपरिक पोलीस बंदोबस्तासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत जिल्ह्यात प्रथमच ‘एआय सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व्हॅन’ तैनात करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या फिरत्या निगराणी यंत्रणेच्या माध्यमातून गर्दीची ठिकाणे, मिरवणूक मार्ग आणि संवेदनशील परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका, नवरात्रोत्सव, गरबा उत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान संशयित व्यक्ती व समाजकंटकांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्यात आला.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गणेशोत्सवादरम्यान भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या विविध कलमांन्वये ३ हजार ८२६ व्यक्तींवर, तर नवरात्रोत्सवादरम्यान २ हजार ८१२ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. अशा एकूण ६ हजार ६३८ व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान १ हजार ७६१ व्यक्तींवर चार दिवसांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली. याशिवाय सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारी, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि एमपीडीए कायद्यान्वयेही कठोर कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून विनापरवाना आणि कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्यांविरुद्ध दुर्गापूर, राजुरा, रामनगर, मूल, सिंदेवाही आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत डीजे साहित्य, जनरेटर, प्रेशर हॉर्न आणि वाहने असा एकूण २ कोटी ९२ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील ३२ हजार २६२ मतदारांसाठी ३० इमारतींमध्ये ५८ मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांची गस्त पथके, २१ स्थिर सर्वेक्षण पथके, १७ भरारी पथके आणि १३ व्हिडिओ सर्वेक्षण पथके कार्यरत होती. सुरक्षेच्या दृष्टीने ३३७ परवानाधारक शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यांत जमा करण्यात आली होती.
सण-उत्सव आणि निवडणुकीच्या संवेदनशील कालावधीत बंदोबस्ताची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले. तसेच सजग नागरिक, शांतता समितीचे सदस्य, उत्सव मंडळे, पोलीस मित्र, विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था, शासकीय विभाग आणि माध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. भविष्यातही नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.




Petrol Price




