महत्वाच्या बातम्या

 कमी पाण्यावर येणारी पिके घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन


- पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाच्या सुचना

- अनुदानावर बियाणे उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : यावर्षी मान्सूनचा पाऊस अपुरा पडल्यामुळे जमिनीतील ओलावा आणि विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर विचार करूनच पिकांची निवड करावी तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी केले आहे.

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या दुष्काळ निवारण आराखडा बैठकीतील सूचनांनुसार आगामी रब्बी हंगामाच्या प्रभावी नियोजनासाठी कृषी विभागातर्फे सध्या मोहीम स्तरावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

पाण्याची मर्यादित उपलब्धता पाहता शेतकऱ्यांनी जास्त पाण्याची पिके न घेता मोहरी, जवस, तीळ, करडई, हरभरा व मसूर या कमी कालावधीत आणि कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची प्राधान्याने पेरणी करावी. जिल्ह्याभरातील बोर, पोथ्रा व निम्न वर्धा सिंचन प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी केवळ २ पाण्याच्या पाळ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपलब्ध २ पाळ्यांनुसार पाण्याचे काटेकोर व अचूक नियोजन करणे गरजेचे आहे.

कृषी विभाग व आत्मा मार्फत ज्वारी, हरभरा, मसूर, करडई, सूर्यफूल, जवस व मोहरी या पिकांची प्रात्यक्षिके आयोजित केली जात आहेत. यामध्ये ज्वारीचे १ हजार मिनीकीट, मसूरचे ७०० मिनीकीट आणि हरभऱ्याचे ९०० मिनीकीट १०० टक्के अनुदानावर पुरवले जाणार आहेत. या प्रात्यक्षिके व बियाणे मिनीकीटचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर तात्काळ ऑनलाईन नोंदणी व अर्ज सादर करावेत.

याशिवाय आगामी काळात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई भासू नये म्हणून १०० टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच व्हीबीजी रामजी योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानित चारा पीक लागवडीचा लाभ पात्र शेतकऱ्यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी तसेच नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos