आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी घेता येणार : विद्यापीठ अनुदान आयोग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : 
एकाच वेळी दोन पदव्या (ड्युअल डिग्री) घेणे विद्यार्थ्यांना आता शक्य होणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) लवकरच धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे 'यूजीसी'चे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी काल शनिवारी जाहीर केले. विविध प्रकारचे छोटे-मोठे अभ्यासक्रम करून त्याद्वारे क्रेडिट (श्रेयांक) घेण्याची सुविधाही विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून, त्यासाठी 'नॅशनल ॲकॅडमिक क्रेडिट बँक' स्थापन होणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी या वेळी दिले.
'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित 'मटा कार्निव्हल'च्या उद्घाटनानंतर 'उच्च शिक्षणाच्या आणि करिअरचे बदलते प्रवाह' या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास शि. प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ या वेळी उपस्थित होते.
'ड्युएल डिग्री'ची मागणी अनेक वर्षांपासून होत असल्याचे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले, 'बदलत्या काळात शिक्षणाचा विस्तार वाढविण्यासाठी व शिक्षण सर्वदूर पोहोचवण्यासाठी यूजीसीही तत्पर आहे. विद्यार्थ्यांना एका वेळी एकाच महाविद्यालयात जाणे शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका पदवीसाठीचे शिक्षण महाविद्यालयातून, तर दुसऱ्या पदवीचे शिक्षण ऑनलाइन अथवा दूरस्थ पद्धतीने (डिस्टन्स एज्युकेशन) घेता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीदेखील उपलब्ध करून दिल्या जातील.'
'देशभर श्रेयांक (क्रेडिट) पद्धत लागू करण्यासाठीही 'यूजीसी'उत्सुक आहे. त्यानुसार विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या मुख्य विषयाची ६० टक्के क्रेडिट व त्यांच्या आवडीच्या विषयाची ४० टक्के क्रेडिट निवडण्याची मुभा द्यावी, अशी आमची भूमिका आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सुट्टीत, कौशल्य विकासासाठी केलेल्या एखाद्या अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमासाठीही क्रेडिट देण्याचा प्रस्ताव आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-01-12


Related Photos