गोंडवाना सैनिकी विद्यालयात दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजा उत्साहात

- शौर्य, शिस्त आणि राष्ट्रसेवेचा संदेश; विजयादशमी पारंपरिक उत्साहात साजरी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : विजयादशमी अर्थात दसऱ्याचे औचित्य साधून गोंडवाना सैनिकी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथे शस्त्रपूजा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतीय संस्कृतीतील शौर्य, पराक्रम आणि विजयाचे प्रतीक असलेल्या या परंपरेतून विद्यार्थ्यांना शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेचा संदेश देण्यात आला. सैनिकी शिक्षणात शस्त्रपूजेला विशेष महत्त्व आहे. देशाचे संरक्षण, अन्यायाविरुद्ध लढा आणि राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी यांचे प्रतीक म्हणून शस्त्रांकडे पाहिले जाते. विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्रपूजा करण्याची परंपरा जपत विद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्रा.संदीप कोटागले,प्रा. गजानन ढोले, प्रा.डॉ.राकेश चडगुलवार,रहीम पटेल प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सैनिकी शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, धैर्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि देशभक्ती रुजविण्यावर भर दिला जातो. शस्त्रपूजेच्या माध्यमातून शस्त्रांचा जबाबदारीने वापर, सामर्थ्याबरोबर संयम आणि कर्तव्याबरोबर विवेक यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावरील विजय आणि नव्या संकल्पांचा संदेश देतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी जीवनात प्रामाणिकपणा, परिश्रम आणि राष्ट्रनिष्ठा जोपासावी, अशी प्रेरणा या कार्यक्रमातून मिळाली. शौर्य, शिस्त आणि राष्ट्रसेवेच्या मूल्यांचा जागर करत गोंडवाना सैनिकी विद्यालयात दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




Petrol Price




