महत्वाच्या बातम्या

  नक्षली पत्रक प्रकरणातील अटकेपासून सुटकेपर्यंत; आदिवासी तरुणांच्या पाठीशी CPI


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भामरागड तालुक्यातील फुलनार–हिदूर दोबूर मार्गावर नक्षली बॅनर व पत्रके लावल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेले स्थानिक तरुण निर्दोष सुटले आहेत. या तरुणांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत न्यायासाठी आवाज उठवण्याचे काम भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोलीने केले. इतर कोणताही राजकीय पक्ष त्यांच्या बाजूने पुढे आला नसताना CPI ने या प्रकरणाचा मुद्दा लावून धरल्याची भूमिका पक्षाच्या वतीने मांडण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांनी सहा स्थानिक तरुणांना अटक केली होती. अटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली होती. संबंधित तरुण सामान्य आदिवासी कुटुंबांतील असून शेती व मजुरी करून उदरनिर्वाह करतात, असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या कुटुंबीयांनी न्यायासाठी CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणात पुढाकार घेत तरुणांची बाजू मांडली.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि कोणत्याही निरपराध नागरिकावर अन्याय होऊ नये, अशी CPI ची भूमिका होती. त्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांच्याकडे निष्पक्ष पुनर्तपासाची मागणी करण्याबाबत पक्षाने पुढाकार घेतला होता.

सचिन मोतकुरवार म्हणाले, या तरुणांच्या कुटुंबीयांनी अडचणीच्या काळात आमच्याकडे मदत मागितली. त्यांच्या वेदना आणि चिंता समजून घेत आम्ही त्यांची बाजू घेतली आणि हा मुद्दा लावून धरला. आज हे तरुण निर्दोष सुटल्याचे समजल्याने समाधान वाटते. आमच्यासाठी हा राजकीय श्रेयाचा विषय नव्हता, तर सामान्य आदिवासी कुटुंबांना न्याय मिळण्याचा प्रश्न होता. संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहणे, हीच CPI ची भूमिका आहे.

तरुण निर्दोष सुटल्यानंतर कॉ. सचिन मोतकुरवार यांनी त्यांच्यासोबत छायाचित्र काढले. या माध्यमातून तरुणांच्या न्यायासाठी पक्षाने घेतलेल्या भूमिकेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली. यावेळी CPI चे जिल्हा सदस्य कॉ. सुरज जक्कुलवार आणि संबंधित भागातील ग्रामस्थ उपस्थित होते. आदिवासी, गरीब आणि सामान्य नागरिकांवर अन्याय झाल्यास त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहू. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा संघर्ष जारी रहेगा, अशी भूमिका कॉ. सचिन मोतकुरवार यांनी व्यक्त केली.





  Print






Related Photos