महत्वाच्या बातम्या

 संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसच्या वोट रक्षकांनी सजग प्रहरी म्हणून तैनात राहावे : जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने वोट रक्षक म्हणून सजग व कर्तव्यदक्ष राहावे. मतदार यादीतून पात्र नागरिकांची नावे वगळली जाणार नाहीत, याची दक्षता घेत मतदारांचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार संविधान रक्षा मार्च व वोट रक्षक अभियानाच्या नियोजनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे विधानसभा प्रभारी, बीएलए-१ आणि ब्लॉक अध्यक्षांची आढावा बैठक सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी अभियानाची उद्दिष्टे, संघटनात्मक जबाबदाऱ्या, मतदान केंद्रनिहाय नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले.

देशाचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे तटरक्षक दल सज्ज असते, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या वोट रक्षकांनी भारतीय लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सजग प्रहरी म्हणून काम करावे. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांची प्रत्यक्ष पडताळणी करून कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मतदारांचा अधिकार हिरावून घेण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटितपणे आपली जबाबदारी पार पाडावी, असे धोटे यांनी स्पष्ट केले.

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी वोट रक्षक अभियानाचे सविस्तर सादरीकरण केले. ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी, प्रत्येक मतदान केंद्रावर वोट रक्षकांची नियुक्ती, त्यांना प्रशिक्षण, मतदार यादीतून वगळलेल्या नावांची पडताळणी, नागरिकांचे निवेदन संकलित करणे आणि दैनंदिन अहवाल सादर करणे या प्रक्रियेची माहिती त्यांनी दिली. या संपूर्ण अभियानावर ब्लॉक अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष आणि सर्कल अध्यक्ष दररोज देखरेख ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

२२ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर किमान एका प्रशिक्षित वोट रक्षकाची नियुक्ती करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच २६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे आयोजित संविधान रक्षा मार्चमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.

या बैठकीला खासदार प्रतिभाताई धानोरकर, राजुरा विधानसभा प्रभारी हैदर अली दोसानी, बल्लारपूर विधानसभा प्रभारी ॲड. नंदाताई पराते, चिमूर विधानसभा प्रभारी संदेश शिंगलकर, वरोरा विधानसभा प्रभारी हनुमंत मडावी, जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, प्रदेश पदाधिकारी संतोष रावत, रोशनलाल बिट्टू, प्रेरणा गौर, बीएलए-१ डॉ. विजय घरत, नगराध्यक्ष अरुण धोटे, खेमराज तिडके, प्रवीण काकडे, राहुल घोटेकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष सफाक शेख, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेनेकर यांच्यासह प्रमोद बोरीकर, दिनेश चोखारे, राजू रेड्डी, प्रवीण पडवेकर, अहेतेश्याम अली, विनोद अहिरकर, गुरुदास चौधरी आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद बोरीकर यांनी केले. संचालन रामकृष्ण कोंडरा यांनी केले, तर आभार सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल यांनी मानले.





  Print






Related Photos