बॉल बॅडमिंटनमध्ये बल्लारपूर पब्लिक स्कूलचा सलग दुसऱ्यांदा जिल्हास्तरीय विजय : दोन्ही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत बल्लारपूर पब्लिक स्कूल, येनबोडीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सलग दुसऱ्यांदा दणदणीत यश संपादन केले. १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने आणि १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत दोन्ही गटांत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या विजयामुळे दोन्ही संघांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत आयोजित ही जिल्हास्तरीय स्पर्धा चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेत बल्लारपूर पब्लिक स्कूलच्या दोन्ही संघांनी सांघिक कौशल्य, उत्कृष्ट समन्वय आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना मागे टाकत विजेतेपद मिळविले. शाळेने सलग दुसऱ्यांदा मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.
१७ वर्षांखालील मुलींच्या विजयी संघात श्रावणी चौधरी, रामेश्वरी विरुटकर, तुळशी कोल्हे, सोनाली सोमवंशी, पूर्वी वासाडे, मंजिरी चालुरकर, अनुष्का शेडामाके, अर्शिता नागराळे आणि श्रावणी येरगुडे यांचा समावेश आहे. तर १४ वर्षांखालील मुलांच्या संघात अर्णव चौधरी, वेदांत आकटकर, साहिल सोमवंशी, श्रेयांश तेलतुंबडे, परिमल धकाते आणि रेयांश गेडाम यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
या यशामागे संघाच्या प्रशिक्षिका सरोज यादव यांचे मार्गदर्शन, खेळाडूंचा नियमित सराव, मेहनत आणि योग्य नियोजन महत्त्वपूर्ण ठरले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक संजय वासाडे, व्यवस्थापक डॉ. मेघा शुक्ला आणि मुख्याध्यापिका ज्योत्सना बाबुलकर यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही खेळाडूंच्या यशाचे कौतुक केले. आता विभागीय स्तरावरील स्पर्धेतही दोन्ही संघ विजयाची परंपरा कायम राखतील, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला.




Petrol Price




