महत्वाच्या बातम्या

 नागपूर : एनआयटीच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या अंबाझरी जवळील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास सदर घटना घडली. कुणाल किशोर साल्पेकर (३६) असे मृतकाचे नाव आहे.

माहितीनुसार, ते मागील दोन महिन्यांपासून तलावात पोहायला जात होते. त्यांना पोहायला येत होते. दररोजप्रमाणे रात्री आठ वाजताच्या सुमारास ते पोहत होते. पूलमध्ये एका दोरीला पकडून ते पाण्यात खाली जाऊन वर येत होते. ते खाली गेले व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. ते बाहेर येतील असे इतरांना वाटले. मात्र वेळेत बाहेर न आल्याने लाईफगार्ड धावले. त्यांना बाहेर काढण्यात आले व प्रथमोपचार करून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. बजाजनगर पोलीस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने मेडिकलमध्ये नेले.

मात्र डॉक्टरांनी साल्पेकर यांना मृत घोषित केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साल्पेकर हे आयटी प्राध्यापक होते. या घटनेमुळे एनआयटीच्या स्विमिंग पूलच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तेथे इतर जण पोहत असताना व लाईफगार्ड उपस्थित असताना असा प्रकार घडलाच कसा असा सवाल निर्माण होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सध्या उन्हाळा असल्याने स्विमिंग पूलमध्ये गर्दी आहे. लहान मुलेदेखील मोठ्या प्रमाणात पोहायला येतात. त्यातच असा प्रकार झाल्याने जलतरणपटूंच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मागील वर्षी कळमेश्वर येथील स्विमिंग टॅंकमध्ये बुडून एका डॉक्टरचा मृत्यू झाला होता.





  Print






News - Nagpur




Related Photos