महत्वाच्या बातम्या

 दारू पिऊन ड्यूटीवर आलेली महिला वैमानिक निलंबित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : विमानोड्डाणापूर्वी बंधनकारक असलेल्या मद्यचाचणीदरम्यान सकारात्मक आढळून आलेल्या एका महिला वैमानिकाला एअर इंडियाने निलंबित केले आहे. ७८७ जातीच्या विमानाचे सारथ्य करीत असल्यामुळे सेलेब्रिटी वैमानिक अशी या महिला वैमानिकाची ओळख आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिल्लीहून हैदराबादसाठी ६ एप्रिल रोजी ही महिला विमान घेऊन जाणार होती. मात्र, उड्डाणापूर्वी करण्यात आलेल्या मद्यचाचणीदरम्यान तिचे निकाल सकारात्मक आले. त्यानंतर तिला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. गेल्या महिन्यातदेखील मद्यप्राशन करून परदेशातून भारतात विमान घेऊन आलेल्या एका वैमानिकाला बडतर्फ करण्यात आले. 

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या नियमानुसार विमानाच्या प्रवासाअगोदर व नंतर मद्यप्राशनाची चाचणी करण्यात येते. जर वैमानिक किंवा केबिन कर्मचारी पहिल्यांदा या चाचणीमध्ये सकारात्मक आढळून आले, तर त्यांच्याविरोधात तीन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई केली जाते. जर दुसऱ्यांदा आढळून आले तर त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येते. जर तिसऱ्यांदा संबंधितांची चाचणी सकारात्मक आली तर त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जातो. दरम्यान, २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत देशात एकूण ३३ वैमानिकांविरोधात तसेच ९७ केबिन कर्मचाऱ्यांविरोधात मद्यप्राशन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos