महत्वाच्या बातम्या

 व्यापाऱ्याची ५.३९ कोटींनी फसवणूक : मुंबईतून दोघांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : गुंतवणुकीवर वार्षिक १५ ते २० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत कोळसा व्यापाऱ्याची ५.३९ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

राजू बोइलाल मंडल (३८) चारकोप, कांदिवली, मुंबई आणि दिनेश रामअजोर मिश्रा (४२) ठाकूर व्हिलेज, कांदिवली, मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मंदार अनिरूध्द कोलते (नागपूर), सुरज डे (मुंबई), मंगेश उर्फे दिनेश वामन पाटेकर (मुंबई), अल्पेश सुरेशभाई पटेल (गुजरात) व मोहम्मद जवाद फारूख बोरा उर्फ भरत सुलेमान (गुजरात) यांना अगोदरच अटक करण्यात आली आहे. तर मुकेश चव्हाण, मोहनीश बदानी (राहुल), अमन पांडे, भरत उर्फ सुलेमान, करन राजोरा, विक्रांत राजपुत, राकेश कुमार, दिनेश जोशी, राहुल गायकवाड व संदीप पाटील हे आरोपी फरार आहेत.

या टोळीने व्यावसायिक अंकुर अग्रवाल यांना एक्स्ट्रीम नेटवर्क्स इंडिया प्रा.लि. कंपनीत गुंतवणूक केल्यास तीन महिन्यात १५ ते २० टक्के नफ्याचे आमिष दाखविले. त्यांनी कंपनीचे खोटे एजंट बनुन नकली डिमांड ड्राफ्ट दिले. त्यांनी वेळोवेळी कंपनीच्या नावे ५.३९ कोटी रुपये घेतले. अग्रवाल यांच्या सिक्युरिटीचे कोऱ्या धनादेशांचा जेव्हा टोळीने दुरुपयोग केला तेव्हा फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राजू आणि दिनेश मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आर्थिक शाखेने सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत कारसह एक कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos