रामगड - भटेगाव मार्गावर दारू तस्करांकडून २७ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिस विभागाच्या वतीने ठिकठिकाणी नाकाबंदी करून अवैध दारू तस्करीवर पाळत ठेवण्यात येत आहे. तरीही दारू तस्कर वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून दारूची तस्करी करतात. दारूची तस्करी करून इतर वाहनांमध्ये भरत असताना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कारवाई करून तब्बल २६ लाख ९८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई काल १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे.
कोरची येथील अवैध दारू विक्रेता निर्मल धमगाये हा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पुराडा, रामगड परिसरात मोठ्या वाहनाने दारूसाठा आणणार असून इतर दारूविक्रेत्यांना दारू पुरविल्या जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीच माहितीच्या ठिकाणी पोहचून सापळा रचला. यावेळी निर्मल धमगाये याचे पिक अप वाहन रामगड - भटेगाव दरम्यानच्या मार्गावर आले. निर्मल धमगाये याने इतर दारूविकेत्यांशी आधीच बोलणी करून ठेवली होती. त्याप्रमाणे चारचाकी व दुचाकीने काही दारूविक्रेते दारू नेण्यासाठी आले.  या वाहनांमध्ये दारूच्या पेट्या भरल्या जात असताना पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच दारू तस्करांनी पोलिसांच्या अंगावर वाहन टाकून चिरडण्याचा प्रयत्न केला. पोलिस पथकाच्या सावधानतेने जिवीतहाणी टळली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून वाहने घटनास्थळीच सोडून दारू तस्करांनी पळ काढला. घटनास्थळावरील वाहनांची तपासणी केली असता विदेशी कंपनीच्या १५ लाख ४६ हजार ५०० रूपये किमतीचा दारूसाठा आढळून आला. ११ लाख ४५ हजार रूपये किमतीची वाहने व इतर मुद्देमाल असा एकूण २६ लाख ९८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनेबाबत पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम यांनी पुराडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींवर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम, दादाजी करकाडे, भाउराव बोरकर, कानु गुरनुले, नुतेश धुर्वे, माणिक निसार यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-17


Related Photos