महत्वाच्या बातम्या

 कापूस पिकावर देशभरातील कृषी तज्ज्ञांचे नागपूर येथे होणार मंथन


- डॉ. पंजाबराव देशमुख कृषि वि‌द्यापीठ व केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचा संयुक्त उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : कापूस पिकासाठी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाची वार्षिक आढावा बैठक ५ व ६ एप्रिल २०२४ रोजी ऑरेंज सिटी  नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि वि‌द्यापीठ, अकोला व केंद्रिय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीला देशभरातील २१ अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पामधून २५० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ, शासकीय तथा खाजगी संस्थेतील संशोधक, अधिकारी तथा प्रयोगशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीचे उ‌द्घाटन ५ एप्रिल २०२४ रोजी वसंतराव नाईक प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर येथे संपन्न होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या महत्वाकांक्षी बैठकीस भारतातील प्रमुख कृषी संशोधक उपस्थित राहणार आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या पीक विज्ञान विभागाचे उप महानिदेशक डॉ. तिलक राज शर्मा, सहाय्यक महनिदेशक (बियाणे) डॉ. डी. के. यादव, केंद्रिय कापूस संशोधन संस्था नागपुरचे निदेशक डॉ. वाय. जी. प्रसाद, कृषि वैज्ञानिक भरती बोर्ड नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष तथा अखिल भारतीय समन्वित कापुस संशोधन प्रकल्पाच्या कार्यक्रम निरीक्षण आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, केंद्रीय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबईचे निदेशक डॉ. एस. के. शुक्ला, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती राहील. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ तथा अखिल भारतीय समन्वित कापूस संशोधन प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. जी.टी बेहेरे, कृषी महाविद्यालय नागपुरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू हे या बैठकीत सहभागी होणार आहेत.

दोन दिवसीय या बैठकीत देशभरात कापूस पिकाबाबत सरकारी व खाजगी संस्थेद्वारे चालणाऱ्या संशोधनाचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीत नवीन वाण व तंत्रज्ञान प्रसारित करण्यासोबतच कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठीच्या उपाय योजनांवर सांगोपांग चर्चा होणार आहे. महाराष्ट्र राज्यात सन २००५ नंतर प्रथमच अश्या प्रकारच्या वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन होत असून या बैठकीच्या यशस्वी आयोजनाकरिता डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्रकाश कडू, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, नागपूर, डॉ. सुरेंद्र देशमुख, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (कापूस), डॉ. गणेश बेहरे, नोडल अधिकारी, अखिल भारतीय समन्वित कापुस संशोधन प्रकल्प, नागपूर यांच्यासह कृषि महाविद्यालय, नागपूर येथील सर्व प्राध्यापक वर्ग, कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि वि‌द्यापीठ, अकोलाचे शास्त्रज्ञ अथक परिश्रम करीत आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos