महत्वाच्या बातम्या

 निवडणूक विषयक दोन दिवसीय प्रशिक्षण


- ८ हजार ६८३ अधिकारी, कर्मचारी घेणार प्रशिक्षण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पुर्वतयारीला वेग आला असून  निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन दिवस २७ व २८ मार्च रोजी जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये आर्वी विधानसभा मतदार संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आर्वी येथील गांधी विद्यालय व रोशन सेलिब्रेशन हॉल, देवळी विधानसभा मतदार संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे देवळी येथील भोंग सभागृह व जनता विद्यालय, हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हिंगणघाट येथील बिडकर कॉलेज व वर्धा विधानसभा मतदार संघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चरखागृह व जी. एस कॉलेज वर्धा येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी प्राधान्याने करावयाच्या बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी सर्व यंत्रे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे. मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर मॉकपोल घेणे. मतदान कार्यपद्धती, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसे हाताळावे, मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी सुलभता व्हावी तसेच मतदान प्रक्रियेवेळी कोणतीही अडचण येऊ नये व यंत्र हाताळणीचा अधिकाधिक सराव व्हावा, यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये ८ हजार ६८३ अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षित होणार असून आर्वी विधानसभा मतदारसंघात १ हजार ६८७, देवळी विधानसभा मतदार संघात ९३८, हिंगणघाट विधानसभा मतदार संघात १ हजार ८८५ तर वर्धा विधानसभा मतदार संघामध्ये ४ हजार १७३ अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण घेणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos