महत्वाच्या बातम्या

 नवउद्योजकांना इंक्यूबेशन सेंटर मार्गदर्शक ठरणार : आमदार डॉ. पंकज भोयर


- इंक्यूबेशन कम बिजनेस फॅसीलीटेशन सेंटरचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : नवउद्योजकांच्या छोट्या छोट्या अडचणी असतात. बऱ्याच लोकांची इच्छा असते की, नवीन कुठलातरी व्यवसाय सुरू केला पाहिजे. व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल लागते. बँकेमार्फत कर्ज घेण्यासाठी डी.पी. आरची आवश्यकता असते. तो कसा करायचा किंवा नवीन उद्योग उभारतांना कोणती काळजी घ्यायची याबद्दलची माहिती नवउद्योजकांना नसते. आता नवउद्योजकांना येणाऱ्या सर्व अडचणींबाबत इंक्यूबेशन कम बिजनेस फॅसीलीटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन होणार असल्याने इंक्यूबेशन सेंटर नवउद्योजकांना मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, इनफेड नागपूर व जिल्हा प्रशासनाच्या वतीने वर्धा येथील शासकीय तांत्रिक शाळेच्या परिसरात इंक्यूबेशन कम बिजनेस फॅसीलीटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, इनफेड नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवाजी धवड, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त नीता औघड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कमलेशकुमार जैन, इनफेडचे मेंटॉर मिर्झा, एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप घुले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक सागर आंबेकर, सीएम फेलो केदार टोंगे, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक धिरज मनवर, महात्मा गांधी नॅशनल फेलो रुपेश रामगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये उद्योजकांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजे. येणाऱ्या काळात नवउद्योजक तयार झाले पाहिजे त्यासाठी लागणारी मदत, संपूर्ण मार्गदर्शन इंक्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून होणार आहे. इंक्यूबेशन सेंटर हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम असून नवउद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यतेचा शोध घेणे किंवा चालना देण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे, असे आमदार डॉ. भोयर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, जिल्ह्यामध्ये दळणवळणांची चांगली साधने उपलब्ध आहेत. जिल्ह्यात उद्योग आले पाहिजे त्यादृष्टीने उद्योजकांच्या अडचणी एकाच ठिकाणी सोडविण्यासाठी इंक्यूबेशन सेंटर उपयुक्त ठरणार आहे. नवउद्योजकांना इंक्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

आयआयएम नागपूरचे संचालक भीमराया मेत्री म्हणाले, वर्ध्यात सुरू झालेल्या इंक्युबेशन सेंटरला आयआयएमचे सहकार्य नेहमीच उपलब्ध राहील. सरकारने कौशल्य विकासावर भर दिला आहे. या सेंटरच्या माध्यमातून नक्कीच उद्योजकांना मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त निता औघड यांनी केले. संचालन महात्मा गांधी नॅशनल फेलो रुपेश रामगडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार इनफेड नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवाजी धवड यांनी मानले.





  Print






News - Wardha




Related Photos